लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल (Lok Sabha Elections 2024 Results) बहुतेक एक्झिट पोलचा अंदाज चुकवणारे ठरले आहेत. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) 293 जागा जिंकल्या. तर विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीला (I.N.D.A.) 232 जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत एनडीएचं 60 जागांचं नुकसान झालंय. तर इंडियाला तब्बल 103 जागांचा फायदा झालाय. या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीची पिछेहाट झाली. पण, त्यांना बहुमतासाठी आवश्यक असलेला 272 जागांचा टप्पा पार करण्यात यश आलंय. एनडीएला बहुमताचा आकडा पार करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच एकप्रकारे मदत केलीय. राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर देशाचं चित्र आज कदाचित वेगळं असतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राहुल गांधींना कोणती चूक भोवली?
सत्तारुढ आघाडीला पर्याय म्हणून इंडिया आघाडी अस्तित्वात आली. या आघाडीत देशभरातील नेते एकत्र आणण्यात बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) यांची भूमिका महत्त्वाची होती. नितीश कुमार या आघाडीचे समन्वयक होते. त्यांनी वेगवेगळ्या राज्यात फिरुन विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र आणलं. नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखालीच इंडिया आघाडी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देतील असं गेल्या वर्षी वातावरण होतं. पण, प्रत्यक्षात भलतंच घडलं. नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये दाखल झाले. राहुल गांधी यांच्यावर नाराज होऊनच नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला असं मानलं जातंय.
नितीश कुमारांच्या प्रयत्नातूनच ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस तसंच अरविंद केजरीवाल इंडिया आघाडीत सहभागी झाले. हे दोन्ही पक्ष यापूर्वीच्या यूपीएमधील घटकपक्ष नव्हते. नितीश कुमार यांनी त्यांना एकत्र आणलं. पण, या आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला नितीश कुमार यांना या आघाडीत टिकवून ठेवण्यात अपयश आलं.
( नक्की वाचा : PM Modi Speech : 'मी देशवासीयांचा ऋणी आहे', निकालानंतर मोदी काय म्हणाले? )
काँग्रेसच्या मनात काय होतं?
इंडिया आघाडीच्या दोन-तीन बैठकीनंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या राज्यात काँग्रेसनं स्वबळावरच निवडणूक लढवली. कोणत्याही पक्षाला सोबत घेतलं नाही. मध्य प्रदेशात आघाडी करण्याचा समाजवादी पक्षाचा प्रस्ताव देखील त्यांनी फेटाळला. या राज्यात मित्रपक्षांची गरज नाही. स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल अशी काँग्रेसची समजूत होती.
या राज्यातील विजयानंतर इंडिया आघाडीवर वर्चस्व वाढेल. त्याच वर्चस्वाच्या आधारानं आघाडीतील निर्णय घेता येतील असं काँग्रेसचं डावपेच होतं. याच डावपेचामुळे नितीश कुमार नाराज झाले आणि त्यांनी इंडिया आघाडीला रामराम केला. जेडीयूमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आघाडीचे सर्व निर्णय राहुल गांधी घेत होते. त्यांच्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेक मुद्यांवर सहमती होऊ शकली नाही.
( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
नितीश कुमार 'इंडिया' मध्ये असते तर
नितीश कुमार गेल्या 19 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. गेल्या दोन दशकात अनेक राजकीय कसरती करुन मुख्यमंत्रीपदाची खूर्ची टिकवलीय. त्याबद्दल त्यांच्यावर वारंवार टीका झालीय. पण, त्यानंतरही त्यांची बिहारमधील व्होट बँक मजबूत आहे. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांची उपयुक्तता कायम आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडनं 12 जागा जिंकत सर्वांना चकित केलंय. बिहारमध्ये जेडीयूला भाजपाच्या बरोबरीनं जागा मिळाल्या आहेत. त्यांचा पक्ष इंडिया आघाडीत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत असता तर बिहारमध्ये आघाडीला मोठं यश मिळालं असतं. त्याचा फटका एनडीएच्या संख्याबळावर झाला असतं. पण, राहुल गांधी यांच्या चुकीमुळे इंडिया आघाडीनं ही मोठी संधी गमावलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world