जाहिरात

महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?

Why Bjp Lost Maharashtra : पाच वर्षांपूर्वी  23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या.

महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाची कारणं काय?
मुंबई:

Maharashtra Election Results 2024 :  गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपानं महाराष्ट्रात दमदार कामगिरी केली होती. 2019 मध्ये तर 25 पैकी 23 जागा जिंकण्याचा भारतीय जनता पार्टीनं विक्रम केला होता. मागील पाच वर्षात राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. या बदलत्या समीकरणाचा मोठा फटका भाजपाला बसला आहे. पाच वर्षांपूर्वी  23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या.  भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील पराभवाची पाच महत्त्वाची कारणं काय आहेत ते पाहूया 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

1) भाकरी फिरवली नाही म्हणून...

गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं. त्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित आमदारांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून भाजपानं अनेक आमदारांची तिकीटं कापली होती. महाराष्ट्रात भाजपानं हा प्रयोग फारसा केला नाही. लातूर, नांदेड, माढा, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सांगली आणि अमरावती या मतदारसंघातील भाजपाचे विद्यमान खासदार पराभूत झाले. 

निवडणुकीच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी नेहमीच गवगवा होणाऱ्या भाजपाच्या यंत्रणेला या खासदारांवर नाराजी लक्षात आली नाही का? नाराजी लक्षात येऊनही त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं का? प्रस्थापित खासदारांचं तिकीट कापण्याचं धाडस का दाखवलं नाही? हे प्रश्न भाजपाच्या राज्यातील खराब कामगिरीनंतर निर्माण झाले आहेत. भाकरी फिरवण्यात आलेलं अपयश हे भाजपाच्या राज्यातील पराभवाचं पहिलं प्रमुख कारण आहे.

( नक्की वाचा : तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर )

2) मतांचं एकत्रिकरण

राज्यातील दलित आणि मु्स्लीम मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात पडली असल्याचं या निवडणूक निकालात स्पष्ट झालंय. गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवात वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता. वंचित फॅक्टर यंदा चालला नाही. त्याचा फटका महायुतीला बसला असून महाविकास आघाडीला मोठा फायदा झालाय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची पारंपारिक मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली. दुसरिकडं अजित पवारांना सोबत घेऊनही राष्ट्रवादी पक्षाची मतं आपल्याकडं खेचण्यात भाजपाला अपयश आलं.  

3) जातीय समीकरणाचा फटका

मराठवाड्यात मागील लोकसभा निवडणुकीत भाजपानं बीड, नांदेड, जालना आणि लातूर या चार जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत चार पैकी चार जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसलाय. मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन सुरु केलं होतं. या अंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात दिसला.

गेल्या निवडणुकीत मराठवाड्यात भाजपा-शिवसेना युतीनं आठपैकी 7 जागा जिंकल्या होत्या. यंदा फक्त छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा शिवसेनेनं जिंकली. लातूर, नांदेड, जालना आणि बीड या चारही जागा भाजपानं गमावल्या. रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे हे भाजपाचे दोन दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झालं. मराठवाड्यात भाजपाची पाटी कोरी झाली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाला टार्गेट करुन करण्यात आलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात पक्षाला अपयश आलं. 

( नक्की वाचा : रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी )
 

4) विकासापेक्षा भावनिक मुद्दा महत्त्वाचा 

मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रोचा विस्तार ही कामं महायुती सरकारच्या कार्यकाळात झाली. पण, विकासकामांपेक्षा भावनिक मुद्द्यांचं राजकारण या निवडणुकीत वरचढ ठरलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मिळाला. मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या पक्षांच्या बालेकिल्ल्यात पक्षाचं अधिकृत चिन्ह आणि नाव नसूनही या दोन्ही पक्षांनी आपलं स्थान कायम ठेवलंय.  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीचा फटका भाजपाला या दोन भागात बसला.

5) प्रयोग फसला

2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली. उद्धव ठाकरे भाजपापासून वेगळे झाले. त्याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेच्या गटाशी भाजपानं युती केली. शरद पवारांना शह देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं. या प्रयोगाचा अर्थ मतदारांपर्यंत पोहोचवण्यात भाजपाची प्रचार यंत्रणा कमी पडली असा एक निष्कर्ष या निकालानंतर निघाला आहे.

( नक्की वाचा : बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी )
 

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपरिक मतं ही मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत राहिली. ही मत आपल्याकडं खेचण्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अपयश आलं. त्याचबरोबर या प्रयोगाचा विशेषत: अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपाच्या निर्णय भाजपाच्या कट्टर मतदारांनाही फारसा रुजला नाही. त्यामुळे त्यांनी देखील मतदान करण्यास मागील दोन निवडणुकांप्रमाणे उत्साह दाखवला नाही, अशीही एक चर्चा या पराभानंतर सुरु झाली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मतदाना आधी निवडणूक आयोगाची चिंता, विधानसभेची तयारी कशी?
महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत?
What is importnace of Lok Sabha Speaker and finance minister TDP JDU Chandrababu Naidu Nitish Kumar PM Modi
Next Article
Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय?