राज्यातील 5 जागांसह 102 मतदारसंघात आज मतदान, 'या' उमेदवारांवर असेल नजर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections 2024)  आजपासून (शुक्रवार, 19 एप्रिल ) सुरुवात होत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. (प्रातिनिधिक फोटो)
मुंबई:

Lok Sabha Election 2024 Voting : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Elections 2024)  आजपासून (शुक्रवार, 19 एप्रिल ) सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार या मतदारसंघात एकूण 1605 उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये 1491 पुरुष तर 134 महिला उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या 102 मतदारसंघापैकी 45 जागा यूपीएनं तर 41 एनडीएनं जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासह अरुणाचल प्रदेशमधील (60) आणि सिक्कीममधील 32 विधानसभा मतदारसंघातही विधानसभा निवडणूक होत आहे.


कुठं होणार मतदान?

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमधील सर्व 39,राजस्थानमधील 25 पैकी 12, उत्तर प्रदेशातील 80 पैकी 8 आणि मध्य प्रदेशातील 6 मतदारसंघात मतदान होईल. आसाममधील 5, उत्तराखंड 5, बिहार 4, बंगाल 3, मेघालाय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी 2 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे पुदुच्चेरी, मिझोराम, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, लक्षद्विप, सिक्कीम, त्रिपूरा, नागालँड, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी 1 जागेवर मतदान होईल. निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. 

महाराष्ट्रात कुठं मतदान?

महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्पात मतदान होतंय. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सुधीर मुनगंटीवार या भाजपाच्या दोन दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत.

नागपूर 'गड'करी राखणार की काँग्रेस गडाला तडा देणार?
 

कोणत्या दिग्गजांचं भवितव्य ठरणार?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. गडकरी यंदा हॅट्ट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. ते 2014 साली पहिल्यांदा नागपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. काँग्रेसच्या विकास ठाकरे यांच्याशी त्यांची लढत आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान आणि खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्री किरेन रिजीजू  (अरुणाचल पश्चिम) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि अरुणाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नबाम तुकी यांच्याशी त्यांची लढत होत आहे.

आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनेवाल (दिब्रूगड), केंद्रीय मस्त्य, पशू वैद्यकीय आणि डेअरी राज्यमंत्री संजीव बालियान (मुझ्झफरनगर, उत्तर प्रदेश),  पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (उधमपूर), केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (अलवार, राजस्थान), केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल (बिकानेर, राजस्थान), त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देव (त्रिपुरा पश्चिम) मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Advertisement

तामिळनाडूतील निलगिरी मतदारसंघात डीएमकेकडून ए. राजा रिंगणात आहेत. ते यूपीए 2 सरकारमध्ये मंत्री होते. तामिळनाडूच्याच शिवगंगामधून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम निवडणूक लढवतायत. तर भारतीय जनता पक्षाचे तामिळनाडू अध्यक्ष अन्नामलाई मदुराई मतदारसंघातून त्यांचं भवितव्य आजमवात आहेत. अन्नामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.

मतदानाची ओळख असलेली निळी शाई कुठून येते? लगेच का पुसली जात नाही?
 

नक्षलग्रस्त भागात कडक बंदोबस्त

महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडच्या बस्तर या नक्षलप्रभावित मतदारसंघातही पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. सुरक्षित आणि शांततेनं मतदान करण्यासाठी संवेदनशील परिसरात सुरक्षा जवानांची हेलीड्रॉपिंग करण्यात येत आहे. त्यासाठी वायूसेनेचीही मदत घेतली जात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 15 हजार सुरक्षा दलाचे जवान तैनात असतील. निष्पक्ष आणि शांततेत मतदान होण्यासाठी 40 सीएपीएफ कंपन्या सज्ज आहेत. त्याचबरोबर सीआरपीएफच्या 30 आणि एसआरपीएफच्या 17 कंपन्या तैनात आहेत. केंद्रीय दलातील 87 कंपन्या निवडणूक ड्यूटीवर सज्ज आहेत. 

Advertisement

नक्षलग्रस्त दुर्गम भागातील आदिवासींना ना उमेदवार माहीत ना निवडणूक चिन्ह