जाहिरात
Story ProgressBack

नागपूर 'गड'करी राखणार की काँग्रेस गडाला तडा देणार?

Read Time: 4 min
नागपूर 'गड'करी राखणार की काँग्रेस गडाला तडा देणार?
नागपूर:

नागपूर लोकसभेच काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच मुख्य लढत होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोर काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे आव्हान आहे. काँग्रेसचा एकेकाळचा असलेला हा गड नितीन गडकरींनी 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात खेचून घेतला. सलग दोन वेळा विजय मिळवत नागपूर आता भाजपचा गड बनवला. पण हाच गड शाबूत ठेवण्यासाठी गडकरींना कडवी लढत द्यावी लागत आहे. विकास ठाकरे यांनी गडकरीं समोर मोठे आव्हान उभे केले आहे. ते आव्हान गडकरी कसे पेलतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गडकरी 'गड' राखणार? 
केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरींसाठी नागपुरचा गड राखण्याचे आव्हान असणार आहे. मात्र गेल्या 10 वर्षाच देशपातळीवर त्यांनी केलेले काम ही त्यांची जमेची बाजू आहे. शिवाय नागपुरात आणलेली मेट्रो असो की शहरातले रस्ते असोत गडकरींचा त्यात नेहमीच पुढाकार राहीला आहे. मात्र असं असलं तरी स्थानिकांना त्यातून किती जणांना रोजगार मिळाला याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर लोकसभे मध्ये सहा पैकी चार विधानसभेत भाजपचे आमदार आहेत. ही गडकरींची जमेची बाजू आहे. त्यातील एका मतदार संघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत. त्यामुळे गडकरींना मोठे लिड देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल. केंद्रीय पातळीवर गडकरींचा दबदबा आहे. मोदी शहांनंतर जर कोणाचे नाव घेतले जात असेल तर ते गडकरींचे आहे. त्यामुळे देशपातळीवरचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्याचाही विचार मतदान करताना नागपुरकर करतील असेही म्हटले जाते. केलेली कामे आणि लोकसंपर्क, त्याचबरोबर मजबूत संघटनेची असलेली साथ ही गडकरींची जमेची बाजू आहे. शिवाय आरएसएसचे संघटनही गडकरींसाठी मैदानात उतरले आहे. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: फोटो सौजन्य - नितीन गडकरी फेसबूक पेज

काँग्रेसच्या विकास ठाकरेंचे आव्हान 
नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरेंना मैदानात उतरवले आहे. विकास ठाकरेंनी गडकरीं समोर तगडे आव्हान उभे केले आहे. ठाकरे हे विद्यमान आमदार असून ते माजी महापौर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहीले आहेत. आक्रमक नेता आणि तगडा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात. मुत्तेमवार हे चार वेळा याच मतदार संघातून विजयी झाले आहे. यावेळी ते आपला चेला विकास ठाकरेंसाठी मैदानात आहेत. ठाकरे यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची ताकद यावेळी आहे. या मतदार संघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वोट बँकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांची भर पडणार आहे. ही बाब विकास ठाकरेंसाठी दिलासा देणारी आहे. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: फोटो सौजन्य - विकास ठाकरे फेसबूक पेज


   
मतदार संघाचा इतिहास काय? 
नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. पण हा नेहमीच काँग्रेसचा गड राहीला आहे. जवळपास 13 वेळा काँग्रेसने या मतदार संघात बाजी मारली आहे. तर 3 वेळा भाजपला विजय मिळवता आला आहे. काँग्रेसचे विलास मुत्तेमवार हे सलग चार वेळा या मतदार संघातून निवडून आले आहेत. सर्वाधिक वेळा निवडून येण्याचे रेकॉर्ड त्यांच्याच नावावर आहे. बनवारीलाल पुरोहीत या मतदार संघातून तीन वेळा निवडून आले आहेत. दोनदा काँग्रेसकडून तर एक वेळा भाजपकडून त्यांनी विजय मिळवला आहे. 2014 च्या निवडणूकीत काँग्रेसच्या या गडाला गडकरींनी सुरूंग लावला होता. त्यानंतर 2019 मध्येही गडकरींनी विजय मिळवला. आता 2024 ला विजयी मिळवत हॅट्रीक साधण्याची संधी गडकरीकडे असेल. तर एकेकाळचा काँग्रेसचा हा गड पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचून आणण्याचा प्रयत्न ठाकरेंचा असेल.     

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: फोटो सौजन्य - नितीन गडकरी फेसबूक पेज

मतदार संघात कोणाचा दबदबा 
नागपूर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्या पैकी चार मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. तर दोन मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. नागपूर दक्षिण पश्चिम  मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व देवेंद्र फडणवीस करतात. तर नागपूर दक्षिण मतदारसंघात भाजपचेच  मोहन मते आमदार आहेत. नागपूर पूर्व  मतदारसंघा कृष्णा खोपडे हेही भाजपचे आमदार आहेत. तर विकास कुंभारे हे नागपूर मध्यचे प्रतिनिधीत्व करतात. लोकसभेचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे हे नागपूर पश्चिमचे आमदार आहेत. तर नागपूर उत्तर मधून काँग्रेसचे जेष्ठ नेते नितीन राऊत हे प्रतिनिधीत्व करत आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: फोटो सौजन्य - विकास ठाकरे फेसबूक पेज

निवडणुकीच्या केंद्रस्थानी कोणते मुद्दे 
नितीन गडकरींची प्रतिमा ही विकास पुरूष अशीच आहे. मात्र त्यांच्या विकासाला काही प्रमाणात विरोध होत आहे. उड्डाण पुल, सिमेंटचे रस्ते या विरोधात काही लोकांनी भूमिका घेतली आहे. शिवाय विकास कामे झाली पण त्यातून किती स्थानिकांना रोजगार मिळाला हा कळीचा मुद्दा आहे. शिवाय बेरोजगारी आणि वाढती महागाई या मुद्दा विरोधी काँग्रेसने हाती घेतला आहे. त्यामुळे विकास विरूद्ध बेरोजगारी आणि महागाई या भोवती ही निवडणूक लढवली जात आहे.  

Latest and Breaking News on NDTV

जातीचे गणित काय? 
मुस्लिम आणि दलीत मतांची विभागणी या मतदार संघात भाजपच्या पथ्थ्यावर पडलेली दिसते. मात्र यावेळी वंचितने काँग्रेसला पाठींबा दिला आहे. तर एमआयएमचा उमेदवार मैदानात नाही. या शिवाया या मतदार संघात तेली, माळी, कुणबी या समुदायाची मतदारांची संख्या मोठी आणि निर्णायक आहे. त्या खालोखाल दलीत आणि मुस्लिम मतदार आहेत. हलबा समाजही मोठा असून ही मते निर्णायक ठरतात. तेली माळी आणि हलबा समाजाचा कल मागिल निवडणुकीत भाजपकडे होता. हा समाज ज्याच्या बाजूने जातो त्याचा विजय सुकर होतो असा आता पर्यंतचा अनुभव आहे. तर काँग्रेसचा भर यावेळी ओबीसी बरोबरच दलीत, मुस्लिम समाजावर असेल. त्यांची मोट बांधण्याचे काम काँग्रेस करत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination