Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (26 एप्रिल) रोजी मतदान होणार आहे. यामध्ये 13 राज्यातील 89 जागांवर मतदान होईल. सात टप्प्यात यंदा लोकसभा निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी 102 मतदारसंघात जवळपास 65.5 टक्के मतदान झालं होतं.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20, कर्नाटकात 28 पैकी 14, राजस्थान 13, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 8, मध्य प्रदेश 7, आसाम आणि बिहारमधील 5-5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 3, मणिपूर, त्रिपूरा आणि जम्मू काश्मीरमधील 1-1 जागांवर मतदान होणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (वायनाड), केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (तिरुवनंतपुरम), भाजपा नेते तेजस्वी सूर्या (बंगळुरु दक्षिण), अरुण गोविल (मेरठ), शशी थरुर (तिरवनंतपुरम), कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे भाऊ डी. के. सुरेश (बंगळुरु ग्रामीण), कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (मंड्या) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात कुठं मतदान?
महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या पाच मतदारसंघाचा समावेश आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 मतदारसंघांचा समावेश आहे. या 8 मतदारसंघात 204 उमेदवार मैदानात असून एकूण 1,49,25,912 मतदार पात्र आहेत.
( नक्की वाचा : 'काँग्रेसची लूट जिंदगी के बाद भी...' Inheritance Tax च्या मुद्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल )
2019 मध्ये काय होता निकाल ?
2019 मध्ये 89 पैकी भाजपानं सर्वाधिक 50 जागांवर विजय मिळवला होता. तर NDA चे सहकारी पक्ष 8 जागांवर विजयी झाले होते. काँग्रेसनं 21 तर अन्य पक्षांनी 9 जागांवर विजय मिळवला होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार या टप्प्यात एकूण 1,198 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 1,097 पुरुष तर 100 महिला उमेदवार आहेत. तर एक तृतीयपंथी उमेदवार आहे.
पहिल्या टप्प्यात कुठं झालं मतदान?
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्याचबरोबर तामिळनाडूमधील सर्व 39,राजस्थानमधील 25 पैकी 12, उत्तर प्रदेशातील 80 पैकी 8 आणि मध्य प्रदेशातील 6 मतदारसंघात मतदान होईल. आसाममधील 5, उत्तराखंड 5, बिहार 4, बंगाल 3, मेघालाय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी 2 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे पुदुच्चेरी, मिझोराम, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, लक्षद्विप, सिक्कीम, त्रिपूरा, नागालँड, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी 1 जागेवर मतदान झालं.
देशात यंदा सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे. शेवटचा टप्पा 1 जून रोजी होईल. निवडणुकांचे निकाल 4 जून रोजी जाहीर होतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world