मुंबईत 'गुजरात पॅटर्न', उर्वरित राज्यात सेफ गेम! भाजपाच्या यादीचे 4 अर्थ

जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भाजपानं राज्यातील 20 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या या यादीचे 4 महत्त्वाचे अर्थ आहेत.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:

BJP Candidate List in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. भारतीय जनता पक्षानं 2 मार्च रोजी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचंही या यादीत नाव नसल्यानं या चर्चांना जोर चढला होता. आता भाजपानं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गडकरींसह महाराष्ट्रातील 20 जणांचा समावेश केलाय.  

महाराष्ट्राचं काय महत्त्व?

लोकसभेत खासदार पाठवणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक लागतो. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2014 साली झालेल्या निवडणुकीत भाजपानं 23 तर शिवसेनेनं 18 जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती असून त्यांनी 45 जागांचं ध्येय ठेवलंय. 

नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे भाजपाचे ध्येय आहे. त्याचवेळी स्वबळावर 370 आणि एनडीएच्या 400 जागा जिंकण्याचा संकल्प पक्षानं केलाय. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात 45 जागा जिंकणे हे महायुतीला आवश्यक आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच भाजपानं राज्यातील 20 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाच्या या यादीचे 4 महत्त्वाचे अर्थ आहेत.

Advertisement

'बिहार पॅटर्न' महाराष्ट्रात नाही

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपानं 25 तर शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) भाजपासोबत आहे. त्यामुळे भाजपा किती जागा लढणार? हा प्रश्न होता. महाराष्ट्रासारखीच परिस्थिती असलेल्या बिहारमध्ये भाजपा 40 पैकी 17 जागा लढवण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये मान्य केलेला जागावाटपाचा फॉर्म्युला पक्ष महाराष्ट्रात मान्य करणार नाही, हे आता जवळपास स्पष्ट झालंय.

यंदा शिवसेननं 13 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 10 जागांची मागणी केलीय. पण त्यांना प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी जागा मिळणार असून भाजपा 25 पेक्षा जास्त जागा लढवण्याची दाट शक्यता आहे. 20 उमेदवारांची यादी जाहीर करत पक्षानं ते स्पष्ट संकेत दिलेत.

Advertisement

मुंबईत 'गुजरात पॅटर्न'

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भाजपाची प्रतिष्ठा यंदा पणाला लागलीय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी इथं भाजपाचा थेट सामना होतोय. शिवसेनेतील बंडानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत मतदारांची सहानुभूती आणि अँटी इन्कबन्सी याचा फटका बसू नये यासाठी पक्षानं भाकरी फिरवलीय. 

मुंबईत लोकसभेच्या 6 जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेनं प्रत्येकी 3 जागा लढवत शंभर टक्के यश मिळवलं होतं. आता शिवसेनेच्या तीनपैकी 2 खासदार शिंदे गटाकडं आहेत. भाजपानं मुंबईतील 2 उमेदवारांची घोषणा केली असून त्यामध्ये दोन्ही विद्यमान खासदारांचं तिकीट कापलंय. उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल तर ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्या जागी मिहीर कोटेचा यांना संधी दिलीय. पक्षाच्या तिसऱ्या खासदार पूनम महाजन देखील डेंजर झोनमध्ये आहेत. 

Advertisement

गुजरातमध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपानं प्रस्थापितांना तिकीट नाकारण्याचा प्रयोग करत संख्याबळ वाढवलं होतं. भाजपा हा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार असल्याचं या यादीतून स्पष्ट झालंय. 

महाराष्ट्रात सेफ गेम

मुंबईसोडून उर्वरित राज्यात पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये भाजपानं 18 पैकी  जळगाव आणि बीड या दोनच ठिकाणी पक्षानं विद्यमान खासदारांचंच तिकीट कापलंय. त्यातही बीडमध्ये प्रीतम मुंडेंच्या जागी त्यांची मोठी बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देत सेफ गेम खेळलाय.  पक्षानं सांगली ते रावेर आणि नंदूरबार ते लातूर या मतदारासंघातील उमेदवार बदलण्याच्या चर्चा बऱ्याच झाल्या. पण, पक्षानं सेफ गेम खेळत पुन्हा तेच चेहरे मैदानात उतरवले आहेत. 

रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं अनेकांना धक्का बसलाय. खडसे यांच्या पक्षांतरानंतरही रक्षा यांनी भाजपाची शिस्त मोडली नाही. त्या सर्व वादविवादापासून दूर होत्या. पक्षाच्या योजनांचा मतदारसंघात प्रसार करण्याचं फळ रक्षा खडसेंना मिळालं असं मानलं जातंय. 

फडणवीसांना 'फ्री हँड'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणात आव्हान निर्माण करतील अशा दोन बड्या नेत्यांना यंदा लोकसभेची उमेदवारी मिळालीय. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार तर बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. नागपूरमधून नितीन गडकरींचेही तिकीट कायम आहे. त्यामुळे फडणवीसांना राज्याच्या राजकारणात अधिक 'फ्री हँड' मिळणार आहे.

भाजपाचे महाराष्ट्रातील उमेदवार

हिना विजयकुमार गावित- नंदुरबार
सुभाष रामराव भामरे- धुळे 
स्मिता वाघ- जळगाव
रक्षा निखिल खडसे- रावेर
अनुप धोत्रे- अकोला
रामदास चंद्रभानजी तडस- वर्धा
नितीन गडकरी- नागपूर
सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर
प्रतापराव पाटील चिखलीकर- नांदेड
रावसाहेब दादाराव दानवे- जालना
भारती प्रवीण पवार- दिंडोरी
कपिल मोरेश्वर पाटील- भिवंडी
पियूष गोयल- मुंबई उत्तर
मिहीर कोटेचा- इशान्य मुंबई
मुरलीधर मोहोळ- पुणे
सुजय राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर
पंकजा मुंडे- बीड
सुधाकर तुकाराम श्रृंगारे- लातूर
रणजित नाईक निंबाळकर- माढा
संजय काका पाटील- सांगली