माढा लोकसभा मतदार संघ निवडणूक जाहीर झाल्यापासून लक्षवेधी ठरला आहे. या मतदार संघात एकामागून एक घडामोडी घडत गेल्या. त्या अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता उत्तम जानकर यांची या मतदार संघात एन्ट्री झाली आहे. त्यांनी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरात भेट घेतली. त्यानंतर ते आता शरद पवारांची भेट घेणार आहे. त्यानंतर 19 तारखेला होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आपली भूमिका जाहीर करतील. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तम जानकर यांची माढा लोकसभा आणि खास करून माळशिरस मतदार संघात मोठी ताकद आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात त्यांना मानणारा धनगर समाजही या मतदार संघात आहेत. त्यामुळे जानकर हे आपल्या गोटात असावेत यासाठी भाजप बरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटही प्रयत्नात आहे. शिवाय मोहिते पाटलांनीही त्यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे जानकरांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
फडणवीस - जानकर भेट
माढ्यामध्ये भाजपला उत्तम जानकरांची गरज आहे. धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात ताकद या मतदार संघात आहेत. माळशिरस मतदार संघात उत्तम जानकरांचा चांगला होल्ड आहे. हे पाहात फडणवीसांनी जानकरांना भेटीसाठी बोलवले होते. त्यानुसार विशेष विमानाने जानकरांनी नागपूर गाठले होते. फडणवीस आणि जानकरांत तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समजत आहे. या भेटीत जानकरांना विधानसभे बरोबरच विधान परिषदेचे आश्वासन दिल्याचे समजते. ही भेट झाल्यानंतर जानकर नागपुरातून परतले आहेत. मात्र त्यांनी फडणवीसांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याचेही समजते.
जानकर शरद पवारांच्या भेटीत काय झालं?
उत्तम जानकरांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ते शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. याभेटीत मोहित पाटील आणि जानकरांनी एकत्र काम केलं पाहीजे अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केल्याचे जानकरांनी सांगितले. माढ्यासाठी काय काम झालं पाहीजे याचीही चर्चा झाली. दरम्यान आपल्या समर्थकांना पवार साहेबांबरोबर काम केलं पाहीजे असं वाटत आहे. त्यामुळे याबाबत येत्या 19 तारखेला निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोहित पाटलांना जानकरांची गरज?
माढा लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे मोठे मतदान आहे. यावर मोहिते पाटलांचा डोळा आहे. त्यासाठी त्यांना उत्तम जानकर गरजेचे वाटतात. शिवाय माळशिरस मतदार संघातही उत्तम जानकरांची ताकद मोठी आहे. याचा फायदा मोहिते पाटलांना होऊ शकतो. त्यामुळे जानकरांबरोबर जुळवून घेण्याची भूमिका मोहिते पाटलांनी घेतलेली आहे. दरम्यान राजकीय वैर संपलं पाहीजे अशी आपली भूमिका असल्याचे यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले. पवार साहेबांनी दोघांनाही मार्गदर्शन केले असून जानकर 19 तारखेला निर्णय घेतील असेही सांगितले.
उत्तम जानकर भाजपवर नाराज?
आधी विधानसभा मग लोकसभेला उमेदवारी दिली नाही. पक्षात तीस वर्षे काम करूनही पक्षाने डावलले अशी धारणा उत्तम जानकरांची झाली आहे. त्यांनी ही सल बोलूनही दाखवली आहे. राज्यातील पक्ष नेतॄत्वा कडून उपेक्षाच झाली तरी काम करत राहिलो. सोलापूर लोकसभेचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते ही पुर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे जानकर नाराज आहेत. मात्र फडणवीसांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आपले वैर नाही ते आपले चांगले मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले. यासर्व पार्श्वभूमिवर ते शरद पवारांचीही भेट घेणार असल्याचेही समजत आहे. त्यानंतर ते आपली भूमिका 19 एप्रिलला जाहीर करणार आहेत. आगामी विधानसभा माळशिरस मतदार संघातून लढण्याचा जानकरांचा मानस आहे. त्यामुळे त्यांना भाजप की राष्ट्रवादी हा पर्याय निवडायचा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world