Maharashtra Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख निवडणूक आयोगानं मंगळवारी (15 ऑक्टोबर 2024) रोजी जाहीर केली. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी खलबतं सुरु आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर 24 तासांमध्येच महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडले आहेत. विधानसभा निवडणुकांमधील जागावाटपावर जानकर नाराज होते, अशी चर्चा आहे. त्या नाराजीतूनच त्यांनी महायुतीमधून बाहेर पडत स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीपूर्वीही होती चर्चा
महादेव जानकर महायुती सोडणार ही शक्यता लोकसभा निवडणुकीपूर्वीही व्यक्त केली जात होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत त्यांची जागावाटपाबाबत चर्चाही सुरु होती. पण, शेवटच्या क्षणी त्यांना आपल्याकडं राखण्यात महायुतीला यश आलं. महायुतीनं लोकसभा निवडणुकीत परभणीची जागा त्यांच्यासाठी सोडली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते
राज्यातील धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते म्हणून देखील महादेव जानकर यांची ओळख आहे. त्यांनी 2009 साली सर्वात प्रथम माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत जानकर तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर बारामतीमधून लढवली. सुप्रिया सुळे यांना कडवी लढत दिल्यानं ते चर्चेत आले. पवार कुटुंबीयांच्या पारंपारिक बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 70 हजारांपेक्षाही खाली आलं होतं.
( नक्की वाचा : Maharashtra Election : 2024 मध्ये महायुती की मविआ? आकडेवारीतून समजून घ्या निवडणुकीचं चित्र )
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जानकर यांना विधानपरिषदेचे आमदार करण्यात आले. फडणवीस मंत्रीमंडळात त्यांनी पशूपालन, डेअरी विकास आणि मत्सपालन खातं सांभाळलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world