ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार येतं ते राज्य काँग्रेसच्या शाही परिवाराचं ATM बनते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. काँग्रसेला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही. देश जितका कमकुवत होईल तितका काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेसच्या या खतरनाक चालीपासून सावध राहावं लागेल. लक्षात ठेवा एकत्र राहाल तरच सुरक्षित राहाल, असं आवाहन त्यांनी केलं. ते अकोलामध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
महाराष्ट्राला ATM करु नका
सध्या हिमाचल, तेलंगणा आणि कर्नाटक हे राज्य काँग्रेसच्या शाही परिवाराचे ATM बनली आहेत. लोकं सांगतात सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावावर कर्नाटकात वसुली डबल झाली आहे. निवडणुका महाराष्ट्रात आणि वसुली कर्नाटक आणि तेलंगणात डबल झाली आहे. कर्नाटक या लोकांनी दारुच्या दुकानदारांकडून 700 कोटींची वसुली केली आहे. तुम्ही कल्पना करु शकता, जो काँग्रेस पक्ष घोटाळे करुन निवडणुका लढवत आहे, ती निवडणूक जिंकल्यावर किती घोटाळे करेल. आपल्याला महाराष्ट्रात सावध राहायचं आहे, आपण महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या महाघोटाळेबाजांचे ATM होऊ देणार नाही, असं मोदी म्हणाले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकत्र राहाल, तर सुरक्षित राहाल
देश जितका कमकुवत होईल, तितका काँग्रेसला फायदा होईल. काँग्रेस भक्कम झाल्यावर देश असहाय्य होईल. त्यांचा 75 वर्षांचा इतिहास पाहा. त्यांचे पुरावे आजबाजूलाच मिळतील. वेगवेगळ्या जातींमध्ये भांडणं लावणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. स्वातंत्र्यानं काँग्रेसकडून जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम करण्यात आलं. ओबीसी समाजाची वेगळी ओळख होऊ नये यासाठी जंग जंग पछाडले. एससी जमातीच्या जाती एकमेकांत संघर्ष करावा ही काँग्रेसची इच्छा आहे. त्यांच्यात संघर्ष असेल तर त्यांच्या मतांमध्ये विभागणी होईल आणि त्यांचा सत्तेत येण्याचा मार्ग सोपा होईल, असा असा आरोप मोदींनी केला.
( नक्की वाचा : महाराष्ट्र जिंकण्यासाठी मोदींचा MMM मंत्र, वाचाक काय आहे त्याचा अर्थ? )
तुम्हाला काँग्रेसच्या या खतरनाक चालीपासून सावध राहावं लागेल. लक्षात ठेवा एकत्र राहाल तरच सुरक्षित राहाल. हरियणातील नागरिकांनी या मंत्रावर मार्गक्रमण करत विधानसभेत काँग्रेसला धूळ चारली, असं मोदींनी सांगितलं.
बाबासाहेबांना कधीही श्रेय दिलं नाही
काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना कधीही श्रेय दिलं नाही. काँग्रेसनं बाबासाहेबांसोबत जे केलं ते सर्वांना माहिती होणं आवश्यक आहे. नेहरुपासून आजपर्यंत काँग्रेसच्या शाही परिवारानं बाबासाहेबांचा अपमान केला आहे. आज पाहा मोठे धरण, मोठे जलप्रकल्प यामध्ये सर्वात मोठी भूमिका बाबासाहेब आंबेडकर केंद्रात मंत्री होते तेव्हा त्यांची होती. पण, याचं श्रेय काँग्रेसच्या एका परिवारानं लाटले. सर्व काही त्यांच्याच नावावर केलं. देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी अनेक निर्णय घेतले, पण काँग्रेसनं त्याचं श्रेय मिळू दिलं नाही. त्यांनी बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला. बाबासाहेब दलित होते म्हणून काँग्रेसनं हे सर्व केलं, असा आरोप पंतप्रधानांनी केला.