महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची बैठक मुंबईत बुधवारी (23 ऑक्टोबर 2024) झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीचं जागावाटप सुरळीतपणे पार पडले आहे, अशी घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे तीन पक्ष किती जागा लढणार याबाबत वेगवेगळे अंदाज गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त करण्यात आले होते. संजय राऊत यांनी यावेळी तीन्ही पक्ष किती जागा लढणार हे जाहीर केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले राऊत?
आमची शेवटची बैठक शरद पवारांसोबत पार पडली. पवार साहेबांनी आम्हाला मीडियासमोर जाऊन घोषणा करण्यास सांगितलं आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडलंय. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे महाविकास आघाडीतील तीन पक्ष तसंच आघाडीतील इतर पक्षांना समावून घेणारं आमचं जागावाटप आता पूर्ण झालं आहे.
महाविकास आघाडीतील तीन्ही प्रमुख पक्ष साधारण 85-85-85 जागांवर मिळून आमचं 270 जागांवर एकमत झालं आहे. त्याची यादी देखील तयार आहे. उर्वरित जागांसाठी मित्रपक्षासोबत उद्या सकाळपासून बोलणी सुरु होईल. महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं निवडणूक लढवून महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
( नक्की वाचा : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार ठरले ! आदित्य ठाकरेंसह 65 जणांची नावं जाहीर, पाहा संपूर्ण यादी )
शिवसेनेच्या यादीत चूक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्यामध्ये काही चुका असल्याचं राऊत यांनी यावेळी मान्य केलं. या यादीत काही प्रशासकीय चुका आहेत. पक्षाचे नेते अनिल देसाई त्याचा आढावा घेतील, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.