रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Prakash Ambedkar on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच यू टर्न घेतला. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचं घोषित केलं. मित्रपक्षांची यादी न आल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांच्याकडं नवी मागणी केली आहे.
काय केली मागणी?
मनोज जरांगे यांनी कोणाला मतदान करू नये, हे जाहीर करावं, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे, प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी काकाला मतदान दिलं काय अन पुतण्याला मतदान दिलं काय? सत्ता ही कुटुंबात राहणार आहे. त्यामुळं एक खूणगाठ बांधून, यातील किती लायक अन किती नालायक आहेत. याबाबत स्पष्टता करून कोणाला मतदान करायचं नाही, हे जाहीर करायला हवं, अशी मागणी त्यांनी केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जरांगे पाटील यांचा विधानसभेतील रोल संपला असं आम्ही मानत नाही. सत्तर टक्के जागा ओबीसी समाजातील इच्छुकांना देण्यात आलेत. हे पाहता मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होऊ शकतं. तसेच ओबीसीचे मतदान ही एकतर्फी होईल, अशी परिस्थिती आहे. ओबीसी समाज वंचितकडे वळाला आहे, असा आमचा दावा आहे. आम्ही त्यांच्यासाठी लढतोय, त्यामुळं हा वर्ग आमच्यासोबत येईल.
शेत मालाचा हमीभाव हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वंचित कायदा करेल. व्यापाऱ्यांना आम्ही या कायद्यात आणू, जो याचं उल्लंघन करेल त्यांना गुन्हेगार समजण्यात येईल, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. कमीतकमी पाच वर्षांची शिक्षा असेल. आमचे पंधरा आमदार निवडून आले तरी येणाऱ्या सत्तेत आम्ही भागीदार राहू, मग सोयाबीन आणि कापूसला योग्य मोबदला मिळावा, यासाठी आम्ही पाचशे रुपये प्रति क्विंटल बोनस द्यायला लावणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.
Sharad Pawar : निवृत्तीचा इशारा की इमोशनल कार्ड? शरद पवारांच्या नव्या घोषणेचा अर्थ काय?
राज्याची लोकसंख्या 13 कोटीच्या घरात आहे, त्यामुळं आता दोन लाख रोजगार निर्मितीची गरज आहे. उंबरठे झिजवणारा वर्ग संपवायला हवा. तेंव्हा घराणेशाहीचं राजकारण संपुष्टात येईल. महापुरुषाचे, संतांचे, दैवतांची नावं घेऊन दंगली घडवली जातायेत. आमचा अजेंडा सरकारमध्ये जाण्याचा असेल, ज्याला आमचा पाठिंबा हवा आहे. कोणाला कोणाची विटंबना करण्याचा अधिकार नाही, त्याअनुषंगाने आम्ही नवा कायदा आणू, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं आहे.
तब्येतीबाबत अपडेट
प्रकाश आंबेडकर यांनी या पत्रकार परिषदेत त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट दिलं आहे. आपण 9 नोव्हेंबर रोजी सोलापूरमधून सभांना सुरुवात करतोय. माझ्या तब्येतीबाबत बऱ्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या, त्या सर्वांचे आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी प्रचार करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं.