राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NSP SP) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी काळात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असतानाच पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले आणि त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? हे समजून घेऊया
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांनी सांगितलं की, 'माझ्या 14 निवडणुका झाल्या आहेत. राज्यसभेचा दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आह. मी माझं काम करत राहीन. नव्या लोकांना समोर आणलं पाहिजे. मी सुरुवातीची 30 वर्ष बारामतीचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर अजित पवारांनी 30 वर्ष इथं विकास केला. आता आगामी 30 वर्षांची मला व्यवस्था करायची आहे.'
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवार यांनी यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतर ते आता राज्यसभा निवडणूक लढवणार नाहीत का? संसदीय राजकारणातून निवृत्त होणार का? ही चर्चा आता सुरु झाली आहे. अर्थात शरद पवार कोणतंही विधान सहज करत नाहीत. त्या विधानामागे त्यांचे निरनिराळे उद्देश असतात. त्याचे वेगवेगळे अर्थ असतात. पवारांचं ताजं वक्तव्य देखील त्याला अपवाद नाही.
सहानुभूती फॅक्टर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. पक्षाच्या पारंपारिक मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करणे हा त्याचा महत्त्वाचा उद्देश असू शकतो.
शरद पवारांसाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या निवडणुकीत त्यांच्यासमोर घरातूनच मोठं आव्हान आहे. पक्षाच्या पारंपारिक मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी या वक्तव्याचा पवारांना फायदा होऊ शकतो.
(नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य )
महाविकास आघाडीला मजबूत करण्याचा प्रयत्न : राज्यात भाजपाच्या विरोधात महाविकास आघाडीची निर्मिती करण्याचं श्रेय शरद पवारांचं आहे. ही आघाडी राज्यात एकत्र विधानसभा निवडणूक लढवत आहे. या आघाडीतील तीन्ही पक्षांना बंडखोरीचा फटका बसलाय.
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमधील मतभेद समोर आले होते. काँग्रेसला जागावाटपात कमी जागा मिळाल्यानं राहुल गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. या मतभेदाचा फटका महाविकास आघाडीला बसू नये. आघाडीमधील सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी पवारांनी हे वक्तव्य केलं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बारामतीची लढाई : बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतही पवार विरुद्ध पवार लढाई होत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा विजय झाला. पण, आता विधानसभेत प्रत्यक्ष अजित पवारांशी सामना आहे. त्यामुळे ही लढाई सोपी नाही, याची पवारांना नक्की जाणीव असावी. बारामतीमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या लढाईत शरद पवारांच्या या वक्तव्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world