कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवाराच्या प्रचारार्थ महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पहिली सभा कोल्हापूरमध्ये झाली. या सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केली. आठवले यांनी यावेळी कविता, चारोळीच्या माध्यमातून उपस्थितांची दाद मिळवली. नरेंद्र मोदींच्या विकास कामांना पवार साहेंबानी पाठिंबा द्यायला हवा होता. मी तुम्हाला सांगत होतो. अजित दादा सांगत होते चला, तुम्हाला उद्धव ठाकरे चालतात मग बीजेपी, नरेंद्र मोदी का चालत नाहीत?, असा सवाल आठवले यांनी यावेळी विचारला.
उद्धवजी तुम्ही तिकडं जायला नको होतं. तुम्ही तिकडे गेला आणि धनुष्यबाण इकडं आलं. पवार साहेब तुम्ही तिकडं गेला आणि घड्याळ इकडं आलं. देवेंद्रजी तुम्ही इथं होता आणि कमळ इकडंच राहिलं. पवार साहेब तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी इकडं यायला हवं होतं, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेस पक्ष सत्तेत असताना बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम कधी पूर्ण झालं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारनं लंडनच्या घराचं लोकार्पण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका फटक्यात इंदू मिलची जमीन दिली. काँग्रेस असताना 10-15 वर्ष आम्ही ती जमीन मागत होतो, पण त्यांनी ती जमीन दिली नाही. आम्ही महायुतीसोबत आहोत. त्यांना मोठं यश मिळणार आहे, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी चुकीचा प्रचार करुन मतदारासमोर ब्लॅकमेल केलं. संविधान बदलणार अशा अफवा पसरवल्या. महायुती बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारी आहे. नरेंद्र मोदी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे पंतप्रधान आहे. ज्या इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लागू केले, संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली, याची आठवणही आठवले यांनी यावेळी केली.
( नक्की वाचा : 'चला मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु', देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज )
रामदास आठवले यांनी सादर केलेल्या कविता
'आमची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू
त्यांना महायुतीची फुलं वाहू, त्यानंतर महाविकास आघाडीकडं पाहू, आपण सर्वजण महायुतीसोबतच राहू
महाविकास आघाडीवाले बात करते है बडी-बडी, लेकीन चुनकर आयेगा कमल-धुनुष्यबाण और घडी
मा. नरेंद्र मोदीजी की आगे जा रही है विकास की गाडी-गाडी, मा. एकनाथ शिंदे और मैने बढाई है दाढी-दाढी'
'संविधानाचा निर्माता माझा बाप आहे, राहुल गांधी तुम्हाला त्यांचा शाप आहे.'
'या सरकारनं काम केलंय लय भारी, कारण गावा-गावातील जागी झालीय नारी
आता आम्ही करणार आहोत साऱ्या महाराष्ट्राची वारी, पुन्हा एकदा आहे, सत्तेमध्ये महायुतीची पारी'
'या देशात जोपर्यंत आहेत नरेंद्र मोदींची आंधी, प्रधानमंत्री बनू शकत नाहीत राहुल गांधी.'