जाहिरात

'चला मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु', देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पहिली संयुक्त प्रचारसभा कोल्हापूरमध्ये झाली. या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

'चला मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु', देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज
कोल्हापूर:

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पहिली संयुक्त प्रचारसभा कोल्हापूरमध्ये झाली. या प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या सभेत सत्तेवर आल्यास राज्यात सगळीकडं शिवरायांचं मंदिर उभारणार अशी घोषणा केली. तो संदर्भ देत फडणवीस यांनी मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा असं चॅलेंज दिलं.

काय म्हणाले फडणवीस?

आज उद्धवजी इथं आले होते. ते भाषणात म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इंग्रजांवर राग होता म्हणून त्यांनी सुरत लुटली. इंग्रज होतेच कुठं, तुम्हाला आता औरंगजेबांचं नाव घ्यायला लाज वाटू लागली,  इतकं लांगूलचालन ? अशी टीका फडणवीस यांनी केली. 

उद्धवजी तुम्ही म्हणता सगळीकडं शिवरायांचं मंदिर उभारणार, चला तर मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर उभारु, तुम्हाला मदत करायला आम्ही देखील तयार आहोत. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे यांच्या नेतृत्त्वात पहिलं मंदिर तिथं उभारु आणि शिवरायांना वंदन करु, असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

अलिकडच्या काळात गुजरातला पेपरमध्ये जाहिरात देण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचे नेतेच गुजरात कसे पुढे आहे ते सांगतात. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 52 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडीचे नेते रोज खोटं बोलतायत. तुमच्यामुळे या देशाच्या उद्योगपतींना वाटू लागलंय आता गुजरातमध्ये जावं. तुम्ही एकप्रकारे गुजरातचं प्रमोशन करताय हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा सवाल त्यांनी विचारला. देशात रोजगारातही पहिला क्रमांक महाराष्ट्राचाच असेल, असा दावा त्यांनी केला. 

( नक्की वाचा : उद्धव ठाकरे चालतात, भाजपा का नाही? कोल्हापूरच्या सभेत आठवलेंचा शरद पवारांना सवाल )
 

लाडकी बहीण, महिलांना 50 टक्के एसटी प्रवासात सूट, लखपती दीदी या महिलांसाठी योजना आम्ही लागू केल्या. आमच्या बहिणींना आम्ही सुरक्षा देणार आहोत. यांचा एक उमेदवार आमच्या लाडक्या बहिणीला म्हणतो इथं माल आलाय शरम वाटत नाही. यांचा दुसरा उमेदवार महिलांना बकरी म्हणतो, कुठं गेले संस्कार, महिलांना सुरक्षा तुमच्या वाचाळवीरांपासून केलं पाहिजे. महिलांना सुरक्षा देण्याचं काम हेच सरकार करणार आहे. महिलांबाबत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्याचं काम हेच सरकार करतंय आणि करणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना वीमा, मोफत वीज देण्याचं काम केलं. आम्ही सोलार वीज तयार करण्याचं काम करतोय. त्यामुळे पुढील काळत 24 तास मोफत वीज देण्याचं काम आमचं सरकार करतंय. वारंवार कोल्हापूर आणि सांगलीला पूर येत होता. त्यावेळी पूराचं पाणी दुष्काळात पाणी वळवण्याचं काम आम्ही केलंय. प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम आम्ही करतोय त्याला तुमचा आशीर्वाद हवाय. 

काँग्रेसचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हायकोर्टात गेले आहेत. हे निवडून आले तर सर्व योजना बंद करतील. यांच्या राज्यात एकही घोषणा पूर्ण झाली नाही. भाजपाच्या राज्यात घोषणा केलेल्या सर्व योजना सुरु आहेत, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: