मेहबूब जमादार, प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील जागावाटपाची कोंडी अद्याप सुटलेली नाही. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन प्रमुख पक्षांमध्ये सध्या जागावाटपासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. प्रमुख पक्ष चर्चेत मग्न असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी गुगली टाकला आहे. रायगड जिल्ह्यातून शेकापच्या चार उमेदवारांची घोषणा पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील यांनी रायगडमधील उमेदवार घोषित केल्यानंतर पक्षानं आणखी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. सोलापूर िजल्ह्यातील सांगोला आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधारमधूनही पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. सांगोलामधून शिवसेना ठाकरे गटानं तिथं दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पेच निर्माण होणार हे निश्चित आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या उमेदवारांची घोषणा?
शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्ह्यातील चार, नांदेड जिल्ह्यातील कंधार आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या सहा जागांवर दावा आहे. या सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा पक्षानं केली आहे.
शेकापचे जाहीर झालेले उमेदवार
अलिबाग-चित्रलेखा पाटील
पेण-अतुल म्हात्रे
उरण-प्रितम म्हात्रे
पनवेल-बाळाराम पाटील
लोहा-कंधार - श्यामसुंदर शिंदे
सांगोला - डॉ. बाबासाहेब देशमुख
20 जागांची मागणी
जयंत पाटील यांनी रायगडमधील उमेदवार जाहीर केल्यानंतर NDTV मराठीशी बोलताना शेतकरी कामगार पक्ष तसंच डाव्या पक्षाच्या प्रागतिक आघाडीला 20 जागा देण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीनं आमच्या आघाडीला 20 जागा द्याव्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. याबाबत आपली बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसने का बदलला चेहरा? थोरातांना दिलेल्या जबाबदारीचा अर्थ काय? )
ठाकरे गटावर नाराजी?
काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर पाटील शिवसेना ठाकरे पक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. पाटील यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना त्याचा इन्कार केला. काँग्रेसचे आठ मतं फुटल्यानं माझा पराभव केला. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसनं कारवाई केली आहे. त्यामुळे आपली कोणतीही नाराजी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत लवकरच आपण स्टेजवर दिसू असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.