विशाल पुजारी, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीत सत्तारुढ महायुतीनं कोल्हापूर जिल्ह्यावर फोकस केलाय. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पहिली सभा कोल्हापूरमध्येच झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसंच रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. आता भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या (शुक्रवार 8 नोव्हेंबर) कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत.
अमित शाहा कुठं घेणार सभा?
अमित शाह इचलकरंजीचे भाजपा उमेदवार राहुल आवडे यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीमध्ये राज्यातील पहिली सभा घेणार आहेत. विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे राहुल आवाडे हे चिरंजीव आहेत. या दोघांनीही महिनाभरापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केलाय. राहुल आवडे हे जवाहर साखर कारखान्याचे संचालक आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार आहे. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानं ही जागा जिंकण्याची भाजपाला आशा निर्माण झालीय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभेत काय होती परिस्थिती?
हातकणंगले लोकसभा मतदार संघात इचलकरंजीचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आघाडीवर होते. त्यांनी इचलकरंजीमध्ये . 1,10,594 मतं घेऊन आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या आघाडीचा विधानसभेतही फायदा घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
कोल्हापूरवर फोकस का?
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. पण, गेल्या पाच वर्षात राज्यातील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. कोल्हापूर जिल्हा देखील त्याला अपवाद नाही. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी बॅकफुटवर गेली आहे. या जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या निवडीवरुन संभ्रम निर्माण झाला होता. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेसची पुरती शोभा झाली होती.
( नक्की वाचा : महायुती आणि मविआचे जाहिरनामे काय सांगतात? मत देण्यापूर्वी वाचा सर्वांची आश्वासनं )
महाविकास आघाडी मध्येच अनेक कार्यकर्ते नाराज असल्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ केला. कोल्हापूरच्याच सभेत दहा कलमी वचननामा देखील जाहीर केला.
कोल्हापूर जिल्ह्यात अंतर्गत मतभेदामुळे महाविकास आघाडी बॅकफुटवर असल्यानं त्याचा फायदा घेण्यासाठी महायुतीनं या जिल्ह्यावर फोकस केलाय. महायुतीची पहिली संयुक्त सभा, तसंच अमित शाहांच्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ कोल्हापुरातून होण्याचा हाच अर्थ आहे.