'.... तर हिंदूंच्या जमिनी घेतल्या जातील', योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

Yogi Adityanath Speech : महाराष्ट्राला प्रयोगशाळा होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी या प्रचारसभेत केलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
अचलपूर, अमरावती:

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

हिंदूच्या कत्तली या ते विखुरले होते म्हणूनच झाल्या. ते एकत्र असतील तरच सुरक्षित राहतील, असा दावा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

महाराष्ट्राला प्रयोगशाळा होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी या प्रचारसभेत केलं. आम्हाला देशाची चिंता आहे. मात्र काँग्रेस पक्ष फक्त तृष्टीकरण करतो, अशी टीका त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्यावर केली.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

हिंदू विखुरले तर त्यांच्या जमिनी घेतल्या जातील, या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला आरपारचा निर्णय घ्यायचा आहे, असंही योगींनी या भाषणात स्पष्ट केलं.  निजामाच्या राजवटीमध्ये हैदराबाद संस्थानामध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या. तो इतिहास लपवण्याचा प्रयत्न कॉँग्रेस पक्ष करत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

हिंदू विखुरले होते म्हणून त्यांच्या कत्तली झाल्या. ते एकत्र असतील तरच सुरक्षित राहतील, अशी घोषणाही त्यांनी या भाषणात पुन्हा एकदा केली. हिंदू विखुरले होते, त्यामुळेच पाचशे वर्ष अपमान सहन केला. अयोध्येत मंदिर होऊ शकलं नाही, असं त्यांनी सांगितलं. हा नवीन भारत आहे. भारतावर नजर ठेवणाऱ्यांचा हिशेब ठेवला जाईल, असा इशाराही योगींनी दिला. 

Advertisement

( नक्की वाचा : 'बटेंगे तो कटेंगे', काँग्रेस अध्यक्षांनी योगी आदित्यनाथ यांची केली दहशतवाद्याशी तुलना, Video )

देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सुरु आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो, असं योगींनी सांगितलं. या निवडणुकीनंतर नवनीत राणा आणि प्रवीण तायडे यांनी अचलपूरच्या जनतेला अयोध्या दर्शनाला घेऊन यावे, असं आमंत्रणही योगींनी दिलं.