लोकसभेतील मैत्री विधानसभेत तुटली! मुंबईतील जागांवरुन शिंदे-ठाकरे, आमने-सामने

Eknath Shinde vs Raj Thackeray : मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आमने-सामने उभे ठाकले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

प्रत्येक निवडणूक सारखी नसते. त्या निवडणुकीतील प्रश्न, परिस्थिती आणि मित्रपक्षही वेगळे असतात, याची प्रचिती विधानसभा निवडणुकीत येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. पण, विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मनसे आमने-सामने उभे ठाकरे आहेत. विशेषत: मुंबईतील दोन मतदारसंघातील शिंदेच्या भूमिकेमुळे मनसेमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणत्या कारणामुळे नाराजी?

मुंबईतील माहीम आणि वरळी हे दोन मतदारसंघ मनसेसाठी महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी मनसेनं काही महिन्यांपासूनच तयारी सुरु केली होती. माहीम मतदारसंघातून मनसेनं अमित राज ठाकरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

मनसे आणि माहीम मतदारसंघाचं भावनिक नातं आहे. राज ठाकरेंनी मनसेची स्थापना याच मतदारसंघातील शिवाजी पार्क मैदानातील जाहीर सभेत केली होती. राज ठाकरे यांचं निवासस्थान देखील याच भागात आहे. त्यातच राज यांचा मुलगा अमित पहिल्यांदाच माहीममधून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सहकार्य करावं अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. 

पण, शिवसेनेनं माहीममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तीन वेळा आमदार बनलेल्या सरवणकर रिंगणात उतरल्यानं अमित ठाकरेंसमोर कडवं आव्हान निर्माण झालंय. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रचासभा घेतली होती. पण, आता राज ठाकरेंचे चिरंजीव रिंगणात असताना शिंदे यांनी माघार न घेता तगडा उमेदवार दिल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

( नक्की वाचा : शरद पवार विरुद्ध अजित पवार, बारामतीच नाही तर 11 ठिकाणी काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला )

वरळीतही तगडं आव्हान

माहीम प्रमाणेच वरळी मतदारसंघातील निवडणूक मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे. आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळीमध्ये मनसेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. देशपांडे गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात प्रचार करत आहेत.  शिवसेना शिंदे गटाकडून मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना धनुष्यबान चिन्हावरून वरळी मधून लढण्याची ऑफर देण्यात आली होती. पण, राज ठाकरे यांनी त्याला नकार दिला होता. 

वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे ही थेट लढत करण्याचा मनसेचा प्रयत्न होता. पण, आता वरळीत मिलिंद देवरा यांची एन्ट्री झाली आहे.

मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार आहेत. शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना राज्यसभेची खासदारकीही देण्यात आलीय. दक्षिण मुंबईतील राजकारणाचा बडा चेहरा असलेल्या देवरांची वरळीच्या मैदानात एन्ट्री झाली तर ही निवडणूक तिहेरी होणार हे नक्की आहे. तिरंगी लढतात मनसेसमोरचं आव्हान आणखी खडतर होणार आहे. 
 

Topics mentioned in this article