रेवती हिंगवे, प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर (सोमवार) आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ही प्रमुख लढत होत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच रंगली होती. अगदी अर्ज दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशी देखील प्रमुख पक्षानं त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली.
महायुतीमध्ये भाजपा सर्वाधिक जागा लढवत आहे. त्याचबरोबर भाजपामध्ये नाराजांची संख्या देखील मोठी आहे.
( नक्की वाचा : महायुतीचे 289 उमेदवार रिंगणात, 3 ठिकाणी परस्परांशी लढत, वाचा सर्व उमेदवारांची यादी )
काय आहे फडणवीस पॅटर्न?
देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईतील निवासस्थान असलेला 'सागर' बंगला सध्या भाजपामधील घडामोडींचं केंद्र बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील असंतुष्टांची रिघ त्यांच्या सागर बंगल्यावर लागली आहे. उपमुख्यमंत्री त्या सर्वांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी देखील सध्या पक्षावर नाराज आहेत. त्यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलीय. त्यांचा राग शांत करण्यासाठी भाजपा नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पक्षाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांना शनिवारी (2 नोव्हेंबर) सकाळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेलं. त्या ठिकाणी त्यांची चर्चा झाली.
( नक्की वाचा : Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट )
सागर बंगल्यावरील भेटीनंतर मी भाजपा कधीच सोडणार नाही. पक्षाचे नुकसान होईल असे काही करणार नाही, अशी ग्वाही गोपालजी शेट्टी यांनी देवेंद्रजी फडणवीस आणि शिवप्रकाशजी यांच्या भेटीनंतर दिली आहे.' असं ट्विट तावडे यांनी केलं.
असंतुष्टांच्या घरावर टकटक...
भाजपासमोर मुंबई प्रमाणेच पुण्यातील नाराजांचं देखील आव्हान आहे. पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातून इच्छूकांची संख्या भाजपामध्ये मोठी होती. साहजिक पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शहरातील प्रमुख नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पाडव्या दिवशी पुण्यातील नाराज नेत्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. धीरज घाटे ,जगदीश मुळीक ,श्रीनाथ भिमाले, संजय काकडे ,सनी निम्हण यांची भेट घेत फडणवीस यांनी केली नाराजी दूर केली.
विधानसभेत संधी नाही मिळाली तरी चिंता नका करू भविष्यात सगळ्यांना न्याय देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या या शिष्टाईला यश आलंय. कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळल्यानं नाराज असलेले पुणे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे यांनी ट्विट करत त्याबद्दल जाहीर प्रतिक्रिया दिली आहे.
'राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक आदरणीय श्री. देवेंद्र जी फडणवीस यांनी शनिवारी पुणे दौऱ्यात माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि परिवारातील माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मागे देवेंद्र जी खंबीरपणे उभे आहेत, हेच भाजपाचे वेगळेपण आहे,' असं जेमतेम सात दिवसांपूर्वी वेगळा विचार करु असा इशारा देणाऱ्या घाटे यांचं ट्विट 'फडणवीस पॅटर्न'चं यश सांगणारं उदाहरण आहे.