शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या प्रचाराची सांगता केली. ठाकरेंचे भाचे वरुण सरदेसाई या मतदारसंघात पक्षाचे उमेदवार आहेत. ठाकरे यांनी या प्रचारसभेत बोलताना महिलांना रेल्वे प्रवास मोफत करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली.
काय म्हणाले ठाकरे?
संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंना अधिक वेळ द्यायला हवं अशी सर्वांची भावना होती, असा दावा ठाकरे यांनी या भाषणात केला. बटेंगे तो कटेंगे हे मी मुख्यमंत्री असताना कुणीही म्हंटलं नाही. तसं बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती, असा दावा ठाकरे यांनी केला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवडीतील सांगता सभेत उद्धव ठाकरेंचा उल्लेख गद्दार म्हणून केला होता. त्यामुळे त्याला उद्धव काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, ठाकरे यांनी या भाषणात राज यांचा थेट उल्लेख टाळला.
त्यांचं पहिलं नाव मनसे होतं. आता 'गुनसे' (गुजरात नवनिर्माण सेना) झालं आहे. महाराष्ट्राचा घात करेल त्याला गुनसे साथ देणार, हे त्यांनी ठरवलं आहे असा टोला उद्धव यांनी राज यांचं नाव न घेता लगावला.
( नक्की वाचा : 'खरा गद्दार घरात बसलाय', उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन राज ठाकरेंचा थेट हल्ला )
महिलांना मोफत रेल्वे प्रवास
राज्य सरकारनं सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडं मोठी मागणी केली. मोदीजी तुमच्या बहिणी खरंच लाडक्या असतील तर त्यांना रेल्वेचा प्रवास मोफत करा, अशी मागणी त्यांनी केली.
संपूर्ण भारतामध्ये मोफत प्रवास केला तर चांगलंच आहे. पण, महिलांना मुंबई आणि महाराष्ट्रभर मोफत रेल्वे प्रवास करुन दाखवा, तर आम्ही तुमचं खरोखर बहिणीवर प्रेम आहे, असं समजू असं आव्हान ठाकरे यांनी केलं. सभेला गर्दी जमत नाही, म्हणून अमित शाह इथून पळाले. त्यांना मणिपूर जळतंय हे समजलं. अमित शाह आणि मोदी दोघंही इथं प्रचारासाठी फिरत होते, त्यावेळी मणिपूरमध्ये अत्याचार होत होते, अशी टीका त्यांनी केली.
आपलं हिंदुत्व काय आहे हे कळल्यामुळे सर्व मुसलमान आपल्यासोबत आले आहेत, मला एका सभेत ख्रिश्चन धर्मगुरुंनीही पाठिंबा दिला, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंकजा मुंडे म्हणाल्या गुजरातमधून 90 हजार जण आपल्यामधून देखरेख करायला बोलावलेत. इतर राज्यातून तुम्ही लोकं इथं आणता याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्र बळकावण्यासाठी आला आहात. विश्वास नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी आला आहात, तुमचा येथील भाजपा कार्यकर्त्यांवर संघाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही, त्यामुळे तुम्ही इथं गुजरातमधून माणसं आणली आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला.
माझी तब्येत सोडा, मला महाराष्ट्राच्या तब्येतीची काळजी आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढेल. यंदा मत फुटलं तर नशीब फुटेल हे सर्व उपरे महाराष्ट्रावर बसतील. आता आपलं कोण आणि आपला शत्रू कोण हे तुम्ही ठरवायचं, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं.