विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला केला आहे. एका माणसाने अख्ख्या पक्षाची वाट लावली. अनेक लोकं निघून गेले त्यांना म्हणतात हे गद्दार आहेत. अरे, गद्दार तर घरात तिथं बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, अशी थेट टीका राज यांनी केली आहे. शिवडीमधील मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारसभेत राज बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खरा गद्दार घरात बसलाय
राज ठाकरे यांनी यापूर्वीच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवर प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष टीका केलीय. पण, त्यांनी मनसेच्या सांगता प्रचार सभेत उद्धव ठाकरेंचा गद्दार असा थेट उल्लेख केला. 'एका माणसाने अख्ख्या पक्षाची वाट लावली. अनेक लोकं निघून गेले त्यांना म्हणतात हे गद्दार आहेत. अरे, गद्दार तर घरात तिथं बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली.
या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो आणि नंतर शिंदे बाहेर गेले. पण जो माणूस बाळासाहेंबाना पहिल्यांदा त्रास दिला, त्या माणसाला (छगन भुजबळ) मातोश्रीवर बोलावतो. बाळासाहेबांना त्रास दिला हे सोडून द्या, त्याचं यांना काहीही देणंघेणं नाही. बाकीचे याचे शत्रू. या सर्व गोष्टीला कारणीभूत एकच माणूस आहे, त्याचं नाव उद्धव ठाकरे,' अशी टीका राज यांनी केली.
( नक्की वाचा : महाराष्ट्राची भाषा घाण करणारा संपादक इथं राहतो, xx डू समजू नका, भांडुपमध्ये राज ठाकरेंचा हल्लाबोल )
उद्धव ठाकरे खाष्ट सासू
राज ठाकरे यांनी या भाषणात उद्धव ठाकरे यांची तुलना घरातील खाष्ट सासूशी केली. त्यांनी एक किस्सा सांगत उद्धव यांच्यावर हल्ला चढवला. एक कुटुंब असतं त्यामध्ये तीन मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं. सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईंशी भांडण सुरु होतं. मुलगा म्हणतो घर दुसरीकडे करु, त्यानं मुलगा आणि सून दुसरीकडं राहायला लागतात. तिसरी सुन आल्यानंतर परत सासूशी भांडण होतं, पुन्हा मुलगा आणि सून वेगळे राहू लागतात. तेव्हा लोकांना कळतं सासूमध्ये प्रॉब्लेम आहे. तसं ही शिवसेनेची सासू तिथं आतमध्ये बसलीय तिचा प्रॉब्लेम आहे. मुलं सोडून गेली त्यांचा प्रॉब्लेम नाही, सासूचा प्रॉब्लेम आहे, असं राज म्हणाले.
महाराष्ट्रात 2019 पासून जे घडलंय ते विसरु नका. त्याला एकच व्यक्ती कारणीभूत आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे, असंही राज यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world