ठाकरेंचा नातेवाईक ते भाजपामधून आयात उमेदवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीची 5 वैशिष्ट्य

Shivsena UBT : शिवसेनेतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये 65 उमेदवारांची घोषणा पक्षानं केली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षानं 9 जागा जिंकल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरुन जोरदार रस्सीखेच रंगली. महाविकास आघाडीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर जागावाटपाच्या बैठकीत जाणार नाही, अशी भूमिका पक्षानं जाहीर केली होती. या वादावादीनंतर आता महाविकास आघाडीमधील जागावाटप अखेर सुरळीतपणे पूर्ण झालं आहे, अशी घोषणा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

शिवसेना (उबाठा) पक्षानं जाहीर केलेल्या उमेदवार यादीचे पाच वैशिष्ट्य पाहूया

भाजपामधून आयात उमेदवार

मुंबई ठाण्याच्या बाहेर शिवसेना सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरमध्ये रुजली. येथील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पक्षाला भरभरुन साथ दिली आहे. तसंच महापालिकेतही सत्ता दिली. पक्षातील फुटीनंतर प्रमुख नेते एकनाथ शिंदेसोबत गेले. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला उमेदवार भाजपामधून आयात करावे लागले आहेत. छत्रती संभाजीनगरमधील 4 पैकी 3 उमेदवार हे भाजपामधून आलेले आहेत.

राजू शिंदे ( संभाजीनगर पश्चिम) सुरेश बनकर (सिल्लोड) आणि दिनेश परदेशी (वैजापूर) हे तीन उमेदवार भाजपामधून आले आहेत. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पैठणचा पेच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचा वाद अद्याप मिटलेला नाही. पैठणमधून 2019 साली संदीपान भुमरे निवडून आले होते. ते पुढं एकनाथ शिंदेकडं गेले. मंत्री झाले आणि चार महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे खासदारही झाले. त्यानंतर ही जागा जिंकण्याचा चंग शिवसेना (उबाठा) पक्षानं बांधलाय. त्याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही इथं दावा असल्यानं पैठणचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.

( नक्की वाचा : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार ठरले ! आदित्य ठाकरेंसह 65 जणांची नावं जाहीर, पाहा संपूर्ण यादी )

काँग्रेसवर कुरघोडी

विदर्भातील जागांसाठी शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस पक्षांमध्ये जोरदार वाद झाला. विदर्भातील रामटेक जागा काँग्रेसकडून घेण्यात पक्षाला यश आलंय. रामटेकमधून विशाल बरबटे मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

मुंबईत अदलाबदली

मुंबईतील वांद्रे पूर्व आणि चांदिवली या जागांची शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस पक्षात अदलाबदल झाली आहे. वांद्रे पूर्वमधून वरुण देसाई शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार आहे. त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालंय. तर चांदिवली मतदारसंघात काँग्रेसकडून नसीम खान निवडणूक लढवण्याची शक्यता आहेत. 

( नक्की वाचा : अजित पवारांच्या मनात काय? पहिल्या यादीनंतर नवाब मलिकसह दिग्गज नेते वेटिंगवर )

ठाकरेंचा नातेवाईक

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीत ठाकरे कुटुंबाशी निगडीत दोन जणांना उमेदवारी मिळाली आहे. आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतून निवडणूक लढवणार आहेत. ते 2019 साली देखील याच मतदारसंघातून निवडून आले होते. 

आदित्यप्रमाणेच वरुण सरदेसाई यांनाही उमेदवारी मिळाली आहे. ते  उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आणि आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. वरुण वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवणार असून त्यांच्यासाठी ही जागा पक्षानं चांदिवलीच्या बदल्यात मिळवली आहे.