राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर होत आहेत. भाजपानं सर्वात पहिल्यांदा 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेनं प्रत्येकी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपा मनसे आणि शिवसेनापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनही 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला समोरे जात आहेत.
लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर अजित पवारांच्या राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. अजित पवारांनी जाहीर केलेल्या यादीत त्याचं प्रतिबिंब उमटलं आहे. राष्ट्रवादीनं महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय आहे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मलिकांना दुहेरी धक्का
माजी मंत्री आणि अजित पवारांच्या पक्षातील मुंबईतील महत्त्वाचे नेते नवाब मलिक यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेलं नाही. नवाब मलिकांवरील भाजपाची नाराजी लपलेली नाही. अंडवर्ल्डशी संबंध तसंच मनी लाँड्रींगच्या आरोपामुळे मलिकांना तुरुंगातही जावं लागलंय. आता मलिक जामिनावर बाहेर आहेत. मुंबईतील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असं मानलं जातंय. पण, पहिल्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.
नवाब मलिक-शेख यांचा परंपरागत मतदारसंघ असेल्या अणुशक्तीनगरमध्ये त्यांची मुलगी सना शेख निवडणूक लढवणार हे जवळपास नक्की झालं होतं. सोशल मीडिया तसंच प्रत्यक्ष मतदारसंघाताही तसंच वातावरण आहे. पण पहिल्या यादीत सना मलिक-शेख यांचंही नाव नाही. त्यामुळे हा नवाब मलिकांसाठी हा दुसरा धक्का आहे.
( नक्की वाचा : विधानसभा निवडणुकीत AIMIM चा भाजपाला फायदा होतो का? आकडेवारीतून समजून घ्या सत्य )
झिशान सिद्दीकीही वेटिंगवर
वांद्रेपूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वीच हत्या झाली आहे. या हत्येनंतर काही दिवसांमध्येच ही निवडणूक होणार असल्यानं याला एक भावनिक महत्त्व आहे. पण झिशान यांनाही उमेदवारीसाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे.
टिंगरेंना भोवली पोर्शे?
पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणात वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव चांगलंच गाजलं. पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या जामीनासाठी त्यांनी दबाव टाकल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीमध्ये टिंगरे यांचाही समावेश नाही. भाजपाचे जगदीश मुळीक या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पोर्शे कार प्रकरणाचा फटका टिंगरेना बसला आहे का? हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world