Maharashtra Zilla Parishad Election Result : विधानसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक, महापालिका निवडणूक आणि आता जिल्हा परिषद निवडणूक या चारही निवडणुकांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत 132 आमदार नगरपालिका निवडणुकीत १३० नगराध्यक्ष तर जवळपास तीन हजार नगरसेवक, २९ महापालिकांपैकी २२ महापालिकांमध्ये सत्ता आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपचाच डंका कायम राहिला आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकही सभा घेणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणे फडणवीसांनी एकही सभा, प्रचार रॅली, भाषण केलं नाही.
भाजप नेत्यांनी अशी सांभाळली जबाबदारी...
असं असलं तरीही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपनं त्या त्या भागातल्या नेत्यांवर जबाबदारी दिली होती. मराठवाड्यावर रावसाहेब दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे लक्ष ठेवून होते. तर नांदेड अशोक चव्हाणांनी तर परभणी मेघना बोर्डीकरांनी सांभाळलं. पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे आणि धनंजय महाडिकांवर देण्यात आली होती. उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन सक्रिय होते. कोकणाची जबाबदारी नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांनी घेतली. चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष देत होते.
भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या छोट्या-मोठ्या सभा झाल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी एकही सभा न घेताही महाराष्ट्रात भाजपच एक नंबरचा पक्ष ठरला. आता याच जोरावर भाजप २०२९ च्या स्वबळाची गणितं आखतोय. आणि म्हणूनच भाजपची ही वाढलेली ताकद हा भाजपच्या मित्रपक्षांसाठी मोठा इशारा ठरतोय.
नक्की वाचा - शरद पवार ICU मध्ये? डॉक्टर काय म्हणाले; रोहित पवारांची कार्यकर्त्यांना नम्र विनंती
भाजपचा ग्रामीण महाराष्ट्र मजबूत करण्यावर भर
राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षात विधानसभेच्या 3 आणि लोकसभेच्या 3 निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 25 ते 28 च्या दरम्यान राहिली. विधानसभा निवडणुकीत भाजपला 26 टक्के, शिवसेनेला 12 टक्के तर राष्ट्रवादीला 9 टक्के मतदान झालं. 2029 मध्ये भाजपला स्वबळावर लढायचं झालं तर भाजपला ४० टक्के मतांचा टप्पा ओलांडावा लागणार आहे. त्यासाठीच भाजपनं ग्रामीण महाराष्ट्र मजबूत करण्यावर भर दिलाय. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप पूर्ण ताकदीनं लढला
ग्रामपंचायत ते लोकसभा सगळ्या निवडणुका भाजप गांभीर्यानं आणि पूर्ण ताकदीनं लढतो. भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक विस्तार असलेला पक्ष झालाय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी महापालिका निवडणुकीतल्या विजयानंतर दिली होती. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष ठरला होता. तसंच पवारांची राष्ट्रवादी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र असं एक समीकरणही होतं. पण आता नगरपालिका निवडणूक आणि पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये भाजप ग्रामीण महाराष्ट्रातलाही एक नंबरचा पक्ष ठरलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world