Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बारामतीतील गोविंदबागेत शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यानंतर कार्डिअॅक रुग्णवाहिकेतून त्यांना पुण्यात हलविण्यात आलं. त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान रुबी रुग्णालयात शरद पवारांवर उपचार करणारे डॉक्टर अभिजीत लोढा यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.
शरद पवार आयसीयूमध्ये आहेत का?
अभिजीत लोढा म्हणाले, शरद पवार यांना कफ झाला आहे. आम्ही त्यांच्या विविध तपासण्यात केल्या आहेत. पुढील दोन ते तीन तासात मेडिकल रिपोर्ट येतील. त्यानंतर त्यांना मुंबईत घेऊन जायचं की पुण्यातच उपचार करायचे याबाबत निर्णय घेण्यात येईल. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. शारिरीक दगदग झाल्यामुळे त्यांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्रास होत होता. त्यांच्या छातीत कफ जमा झाला आहे. कंजेशन झाल्यामुळे त्यांना त्रास होत आहे. मात्र काळजी करण्याचं कारण नाही. शरद पवार यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेलं नाही तर ते एका खासगी रुममध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती नॉर्मल आहे. काही जणांकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आलेलं नाही. त्यांना कोणताही सपोर्ट देण्यात आलं नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना विनंती...
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कळताच राज्यातील कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना न येण्याची विनंती केली आहे. शरद पवारांची प्रकृती स्थित असून कोणीही रुग्णालयात येऊ नका असं रोहित पवारांकडून सांगण्यात आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world