Sada Sarvankar vs Amit Thackeray : माहीम विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी काल (बुधवार 30 ऑक्टोबर) ट्विट करत राज ठाकरे यांना समर्थन देण्याचं आवाहन केलं होतं. त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत राज यांना आवाहन केलं होतं. त्यामुळे त्याला राज काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनी या विषयावर अद्यार जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सरवणकरांना सांगितला इतिहास
राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांना पाठिंबा का द्यावा? असा सवाल अविनाश अभ्यंकर यांनी विचारला. सदा सरवणकर शिवसेना भवनाच्या खाली उर बडवत होते आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. त्यांनी निष्ठेच्या गोष्टी करु नये. हे बाळासाहेबांचे कार्यकर्ते असते तर गुवाहटीला गेले नसते त्याच शिवसेनेत थांबले असते, अशी खोचक टीका अभ्यंकर यांनी केली. त्याचबरोबर सरवणकर स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये गेले होते, असा आरोपही अभ्यंकर यांनी केला.
त्यांच्यावर कोणाचाही दबाव नाही. ते पराभूत मानसिकतेतून आता बोलत आहेत. त्यांनी लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढवावी. आमचा विजय निश्चित आहे. आम्ही किती फरकाने जिंकून येणार, इतकाच विषय बाकी आहे, असं अभ्यंकर यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : 'आबा मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचे, त्यांना कुणी त्रास दिला....' रोहित पाटलांचं मोठं वक्तव्य )
काय म्हणाले होते सरवरणकर?
सदा सरवणकर यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत राज ठाकरेंना भावनिक साद घातली होती. 'मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते.
एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली.राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या.' असं आवाहन सरवणकर यांनी केलं होतं.