BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकामागून एक धक्के बसू लागले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि पक्षाच्या स्थापनेपासून सोबत असलेले माजी नगरसेवक विरेंद्र तांडेल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माहीम विभागातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले असून, यामुळे दक्षिण मध्य मुंबईत मनसेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पक्षांतर्गत वागणुकीवर तांडेल यांची नाराजी
विरेंद्र तांडेल यांनी आपला राजीनामा थेट राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये त्यांनी माहीम विभागातील संघटनात्मक कामकाजावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. स्थानिक पातळीवर काम करताना दिली जाणारी वागणूक अत्यंत अपमानास्पद आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना सन्मान दिला, मात्र स्थानिक व्यवस्थापनात हा सन्मान आणि पक्षाची विचारधारा कुठेही दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि आपुलकी संपल्याने आता या संघटनेचा भाग राहण्यात अर्थ उरला नाही, अशा शब्दात त्यांनी आपली अस्वस्थता ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा : BMC Election 2026 MNS Candidate List: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )
एका पाठोपाठ एक बडे नेते बाहेर
काही दिवसांपूर्वीच मनसेचे पहिल्या पिढीतील नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. धुरी हे मनसेचे आक्रमक चेहरे म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या पाठोपाठ आता विरेंद्र तांडेल यांनीही राजीनामा दिल्याने मनसेच्या बालेकिल्ल्यातच पक्षाची पडझड सुरू झाली आहे. तांडेल हे देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना एकाच विभागातील दोन मातब्बर नेत्यांनी पक्षाची साथ सोडणे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विरेंद्र तांडेल यांचे राज ठाकरेंना उद्देशून संपूर्ण पत्र
प्रति,
आदरणीय श्री. राज साहेब ठाकरे,
अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
मुंबई.
विषय : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबाबत.
सविनय जय महाराष्ट्र!
मा. साहेब,
मी विरेंद्र विष्णू तांडेल, प्रभाग क्रमांक १९०, माहीम, पक्षाच्या स्थापने पासून नवनिर्माण सेनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत कार्यरत आहे. राज साहेब, आपल्या नेतृत्वाखाली मला नेहमीच मान, सन्मान व विश्वास मिळाला आहे. त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन.
मात्र सध्या माहीम विभागातील संघटनात्मक कामकाजात ज्या प्रकारे वागणूक दिली जात आहे, ती माझ्यासाठी अत्यंत अपमानास्पद व वेदनादायक ठरत आहे.
स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेली एकजूट, आपुलकी व संघभावना पूर्णपणे अभावाने दिसून येत आहे. त्यामुळे मला या संघटनेचा भाग असल्याची भावना राहिलेली नाही.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याचा कारभारी कोण? 165 जागा, 1165 उमेदवार; वाचा प्रत्येक वॉर्डातील हायव्होल्टेज लढती! )
राज साहेब, आपण आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच मान-सन्मान दिला आहे, मात्र दुर्दैवाने तो मान आणि आपली विचारधारा मूळ पातळीवरील व्यवस्थापनात प्रतिबिंबित होताना दिसत नाही. यामुळे माझ्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून, या परिस्थितीत पुढे काम करणे मला योग्य वाटत नाही.
या सर्व बाबींचा सखोल विचार करून, कोणताही कटुता न ठेवता, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सर्व पदांचा राजीनामा देत आहे, तो आपण स्वीकारावा ही विनंती.
राज साहेब, आपल्याबद्दल आणि आपल्या विचारांबद्दल माझ्या मनात सदैव आदर राहील.
जय महाराष्ट्र !