Mallikarjun Kharge Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे आता झाले आहेत. सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. चार जूनला या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केलंय. विरोधकांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? याचं अधिकृत उत्तर अद्याप मिळालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपा नेत्यांनी हा मुद्दा प्रचारसभेत वारंवार उपस्थित केलाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी NDTV ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये पंतप्रधानपदाची त्यांची वैयक्तिक चॉईस कोण याचं उत्तर दिलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहे खर्गेंची चॉईस?
काँग्रेस अध्यक्षांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांची पाठराखण केलीय. 'राहुल गांधी हे माझी चॉईस आहेत. ते तरुणांचं तसंच या विशाल देशाचं प्रतिनिधित्व करतात,' असं खर्गेंनी सांगितलं. अर्थात त्यांनी पुढील पंतप्रधान कोण होणार? हे आघाडी अधिकृतपणे ठरवेल, असं यावेळी स्पष्ट केलं.
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन वेळा 'भारत जोडो' यात्रा काढली होती. या यात्रेच्या दरम्यान त्यांनी सहकारी पक्षाच्या नेत्यांसोबत स्टेज शेअर केलं. तसंच अनेकदा एकत्र भोजनही केलं. नरेंद्र मोदींना थेट टार्गेट करणारे राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी लोकप्रिय पर्याय आहेत,' असं खर्गे यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : 'देश वाचवण्याची शेवटची संधी....' PM मोदींचं नाव घेत मनमोहन सिंग यांचं भावनिक आवाहन )
खर्गे पंतप्रधान होणार?
खर्गे यांनी यावेळी ते स्वत: पंतप्रधान होणार या चर्चेलाही उत्तर दिलं. बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये खर्गेंचं नाव पंतप्रधानपदासाठी सुचवलं होतं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रस्तावाचं स्वागत केलं. त्याचबरोबर इंडिया आघाडीतील 12 सदस्यांनी त्यांच्या नावाला सहमती दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
पंतप्रधानपदाच्या चर्चेवर खर्गे म्हणाले की, 'मी माझं नाव कसं सुचवू शकतो? याबाबतचा निर्णय पक्ष घेईल. सहकारी पक्ष माझं नाव कदाचित घेऊ शकतात पण आमच्या पक्षात आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. 2004 किंवा 2009 सारख्या पद्धतीचं पालन होईल.
( नक्की वाचा : PM मोदी कन्याकुमारीत दाखल होताच 33 वर्षांपूर्वीचा फोटो का होतोय Viral? )
प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा होती. पण, राहुल गांधी देशभरातील निवडणूक प्रचारात व्यस्त असल्यानं त्यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रचाराच्या व्यवस्थापणासाठी त्यांची आवश्यकता होती, असं खर्गे यांनी सांगितलं.
विरोधी पक्षांची अनौपचारिक बैठक शनिवारी होणार आहे. या बैठकीत मतमोजणीच्या दिवशी आघाडीची रणनीती निश्चित केली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीत सर्व प्रमुख नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय.