Mira Bhayandar Municipal Election 2026 : मीरा-भाईंदर शहराच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षाच्या दोन माजी नगरसेविका आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (शनिवार, 10 जानेवारी) अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून, यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाला सोडचिठ्ठी आणि शिवसेनेत प्रवेश
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या माजी नगरसेविका, महामंत्री, प्रवक्त्या आणि दिशा समितीच्या सदस्या मीनाताई भोईर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक सूर्यकांत भोईर आणि माजी नगरसेविका माधुरीताई तांबे यांनीही आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सर्व नेत्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली असून भाजपाच्या अडचणीत भर पडली आहे.
नरेंद्र मेहतांवर गंभीर आरोप
पक्ष सोडल्यानंतर मीनाताई भोईर यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आपण भारतीय जनता पार्टीला नाही, तर नरेंद्र मेहता यांच्या जाचाला, एकाधिकारशाहीला आणि त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्ष सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण सिटिंग नगरसेविका असताना आणि सर्वेमध्ये आपले नाव सर्वात पुढे असतानाही केवळ स्वतःच्या मित्रपरिवाराला आणि जवळच्या व्यक्तींना तिकीट देण्यासाठी आपले तिकीट कापले गेले, असा खळबळजनक आरोपही भोईर यांनी यावेळी केला. मेहता यांच्या कार्यपद्धतीमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
( नक्की वाचा : Badlapur News : भाजपाचा मोठा निर्णय! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीची नगरसेवक पदावरून हकालपट्टी )
भाजप नेत्यांना आवाहन
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनाही एक प्रकारे खुली ऑफर दिली आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या महिलांवर किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यावर अन्याय होत असेल, तर प्रताप सरनाईक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी दिला.
नरेंद्र मेहता यांना सोडून भाजपमधील कोणताही निष्कलंक पदाधिकारी जर शिवसेनेत येण्यास इच्छुक असेल, तर त्याचे पक्षात स्वागतच असेल, असे विधान सरनाईक यांनी केले. सरनाईक यांच्या या विधानामुळे भाजपमधील मेहता विरोधक आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world