Mira Bhayandar Mahanagarpalika Election 2026 : मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेसमोर अत्यंत कठीण अटी ठेवल्याने मिरा भाईंदरमध्ये सेना आणि भाजपची युती आता धोक्यात आली असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. या अटी मान्य झाल्या नाहीत, तर भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा थेट इशाराच मेहता यांनी दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे पहिली अट?
नरेंद्र मेहता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचे आमिष दाखवून पक्षात ओढले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
महिनाभरापासून शिवसेनेने भाजपमधून जेवढे कार्यकर्ते फोडले आहेत, ते सर्व तात्काळ परत करावेत, ही महत्त्वाची अट मेहता यांनी घातली आहे. सन्मानपूर्वक युती करायची असेल, तर कार्यकर्त्यांची ही पळवापळवी थांबली पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट! समन्वय समितीच्या पत्रावर फक्त एकाचीच सही, नेमकं काय शिजतंय? )
शिवार गार्डनच्या जागेवरून संघर्ष
दुसरी महत्त्वाची अट म्हणजे मिरा भाईंदरमधील शिवार गार्डनची जागा. ही जागा सध्या शिंदे गटाच्या एका स्थानिक नेत्याने महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतली असल्याचा दावा मेहता यांनी केला आहे.
ती जागा तात्काळ महापालिकेला परत द्यावी आणि त्या ठिकाणी जनतेसाठी सार्वजनिक टाऊन पार्क विकसित करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. या जागेवरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा : Dombivli News : कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांत निवडणुकीची रणधुमाळी थांबणार? उमेदवारांना थेट इशारा )
जागावाटपाचा गुंता आणि शेवटचा इशारा
जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना मेहता यांनी भाजपची ताकद मोठी असल्याचे अधोरेखित केले. भाजपने आपल्या वाट्याला 66 जागा ठेवल्या असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा देण्याचे निश्चित केले आहे.
उर्वरित 21 जागांपैकी केवळ 10 ते 12 जागा शिवसेनेला देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेला एवढ्या कमी जागा मान्य होणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. अटी मान्य झाल्या नाहीत, तर भाजप सर्व 87 जागांवर स्वतंत्रपणे लढण्यास तयार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीकडे लक्ष
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अटींवर चर्चा होऊन युतीचा तिढा सुटतो की युती कायमची तुटते, हे स्पष्ट होईल. या बैठकीच्या निर्णयावर मिरा भाईंदरमधील आगामी निवडणुकीचे संपूर्ण राजकारण अवलंबून आहे. आता शिवसेना या अटींना कसा प्रतिसाद देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world