कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय. यापूर्वी राज ठाकरेंच्या प्रचारसभेत त्यांनी शिंदे पिता-पुत्रांवर थेट टीका केली होती. त्यानंतर 'NDTV मराठी' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील पाणी टंचाईवरुन मुख्यमंत्र्यांवर आरोप केला आहे.
काय आहे प्रकरण?
राजू पाटील आमदार असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे. या भागात नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केलंय. राजू पाटील यांनीही वेळोवेळी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. 'NDTV मराठी' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पाटील यांनी या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचंही नाव घेतलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण-डोंबिवली तसंच ठाणे जिल्ह्यातील पाण्याच्या सोयीसाठी कुशवली धरण मंजूर झालं आहे. कल्याणजवळ होणाऱ्या धरणासाठी जमीन हस्तांतरणाचं काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे हे धरण होण्यासाठी आणखी 10 वर्ष लागतील.
पण, कल्याण ग्रामीणला मिळणारं पाणी ठाण्याला पळवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत ते सर्व व्यवसाय गुजरातला घेऊन चालले आहेत त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ठाण्यात ते पाणी पळवत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ 2009 अस्तित्वात आला. त्यावेळी शिवसेना आणि मनसे लढत झाली. मात्र आता हे दोन्ही वेगळे गटच आहेत. मी यांना पक्ष बोलत नाही ओरिजनल शिवसेना ही बाळासाहेबांची होती. आता तेच विचार घेऊन राज ठाकरे चालले आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.
( नक्की वाचा : Ashish Shelar Interview : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? आशिष शेलारांनी दिलं उत्तर )
यापूर्वीही केली होती टीका
केडीएमसीच्या हक्काचे पाणी ठाण्याला जाते. हा पाणी कोटा आपल्या हक्काचा आहे. या लोकांना तो ठाण्याला पळवून न्यायचा आहे. हे चोरच आहेत, असा आरोप केला होता.