महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल होत असल्याचे वाटत असतानाच माशी शिंकलीय. काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. ही नाराजी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबद्दल आहे. गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने इथून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इथून वर्षा गायकवाड यांनी प्रचाराला नीट सुरूवातही केली नाहीये आणि काँग्रेस पक्षात त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरू झाला आहे. इथला उमेदवार बदलण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते आहे.
चंद्रकांत हंडोरे, सुरेश शेट्टी आणि आमदार भाई जगताप हे तिघे काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांनी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात येऊ नये त्याऐवजी नसीम खान यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नसीम खान यांच्यासाठी मुंबईत हा नवा दबाव गट तयार झाल्याचे दिसून आले आहे.
(नक्की वाचा- 'राग आलाय पक्षाला लाथ मारा, आम्ही उमेदवारी देऊ' नसीम खान यांना ऑफर)
प्रचार न करण्याचा नसीम खान यांचा निर्णय
काँग्रेसने राज्यात एकाही अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही, असं म्हणत नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला आहे. आपण काँग्रेसमध्येच राहणार आहोत, काँग्रेस सोडणार नाही, असं देखील नसीम खान यांनी सांगितले आहे. मी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचार केला. मात्र पुढे प्रचार करणार नाही, असे नसीम खान यांनी जाहीर केले होते.
(नक्की वाचा- Explainer: अश्लील व्हिडिओ स्कँडलमध्ये अडकले माजी पंतप्रधानांचे नातू, तक्रार दाखल होताच का सोडला देश?)
काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?
नसीम खान यांनी घेतलेली भूमिका मुंबई काँग्रेसमधील काही नेत्यांना पटली आहे. यामुळे त्यांनी नसीम खान यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नसीम खान यांनी अल्पसंख्यांक उमेदवार न दिल्याची व्यक्त केलेली खंत ही योग्य असून ही चूक दुरुस्त करण्याची संधी पक्षाकडे असल्याचं दबावगटातील मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. यामुळे वर्षा गायकवाड यांच्याऐवजी नसीम खान यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेसच्या या दबावगटाला काँग्रेस पक्षश्रेष्ठी भेटीसाठी वेळ देणार का? आणि त्यांची मागणी मान्य होणार का? याबाबत मुंबई काँग्रेसमधील नेत्यांना उत्सुकता आहे.
सांगली-भिवंडीतही काँग्रेसची नाराजी
सांगली आणि भिवंडी या जागा मित्रपक्षांच्या वाट्याला गेल्याने स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सांगलीत विशाल पाटील यांची सर्व तयारी झाली असताना ठाकरे गटाने परस्पर येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. याबाबत काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त देखील केली. भिवंडीतही काँग्रेस इच्छूक असताना शरद पवार गटाने उमेदवारी मिळवली. दोन्ही वेळी काँग्रेसने एक पाऊल मागे जात आघाडीतील संभाव्य तणाव टाळला. मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पक्षाची ही भूमिका अजिबात पटलेली नाही आणि त्यांची नाराजी या ना त्या कारणाने बाहेर पडताना दिसत आहे.