BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ (BMC Election 2026) मध्ये उत्तर भारतीय मतांचे महत्त्व लक्षात घेता, अनेक प्रभागांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी उत्तर भारतीय उमेदवार दिले आहेत. विशेषतः कांदिवली, मालाड, गोरेगाव, कुर्ला आणि मानखुर्द या पट्ट्यांमध्ये 'उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय' अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय थेट लढत (BMC २०२६)
प्रभाग क्र. ३२
कांदिवली (पूर्व)
पंकज शोभनाथ यादव (भाजप) विरुद्ध अजय सिंह (शिवसेना - ठाकरे गट)
प्रभाग क्र. १६३
कुर्ला
पंकज यादव (भाजप) विरुद्ध रविराज तिवारी (काँग्रेस)
प्रभाग क्र. १६७
सायन
राजेश सिंह (भाजप) विरुद्ध रामबाबू जैस्वाल (काँग्रेस)
उत्तर भारतीय उमेदवार आणि चर्चेत असलेले प्रभाग
प्रभाग क्र. ३
बोरिवली/कांदिवली
प्रकाश दरेकर (भाजप) विरुद्ध प्रदीप चौबे (काँग्रेस)
प्रभाग क्र. ४
कांदिवली
मंगेश पांगारे (शिंदे गट) विरुद्ध राहुल विश्वकर्मा (काँग्रेस)
प्रभाग क्र. १८
मालाड
सदिच्छा मोरे (मनसे/युती) विरुद्ध मनीष दुबे (NCP - शरद पवार गट)
काँग्रेसने पारंपरिकपणे आपल्याकडे असलेली उत्तर भारतीय मतपेटी टिकवून ठेवण्यासाठी या समुदायातील नेत्यांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपनेही उत्तर मुंबई (बोरिवली-कांदिवली) आणि ईशान्य मुंबई (मुलुंड-घाटकोपर) भागात उत्तर भारतीय चेहरे देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत 'मुंबईचा पुढचा महापौर उत्तर भारतीय असेल' अशा चर्चांमुळे या उमेदवारांमधील चुरस अधिक वाढली आहे. विशेषतः पंकज यादव (प्रभाग १६३) आणि प्रदीप चौबे (प्रभाग ३) यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंबई महानगरपालिकेतील उत्तर भारतीय उमेदवार असलेल्या तीन प्रमुख लढती...
या प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने सर्वच पक्षांनी या समुदायातील प्रबळ नेत्यांना मैदानात उतरवले आहे.
१. प्रभाग क्र. ३२ : कांदिवली (पूर्व)
पंकज शोभनाथ यादव (भाजप) विरुद्ध अजय सिंह (शिवसेना - ठाकरे गट)
हा प्रभाग उत्तर मुंबईतील 'उत्तर भारतीय' राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. ठाकूर व्हिलेज आणि समता नगरचा काही भाग या प्रभागात येतो. भाजपकडून या प्रभागात पंकज शोभनाथ यादव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवर 'युवा चेहरा' म्हणून ओळखले जातात. उत्तर भारतीय हिंदी भाषिक मतदारांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. याचवेळी शिवसेना ठाकरे गटानेही उमेदवारी देताना विचारपूर्वक निर्णय घेतला अन् अजय सिंह यांना संधी दिली. ठाकरे गटाने उत्तर भारतीय मतांमध्ये शिरकाव करण्यासाठी अजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. स्थानिक मराठी आणि उत्तर भारतीय मतदारांच्या 'कॉम्बिनेशन'वर त्यांचा भर आहे. या प्रभागात भाजपचे वर्चस्व राहिले आहे, मात्र ठाकरे गटाने अजय सिंह यांच्या रूपाने तगडे आव्हान दिले आहे.
२. प्रभाग क्र. १६३ : कुर्ला
पंकज यादव (भाजप) विरुद्ध रविराज तिवारी (काँग्रेस)
कुर्ला विधानसभा क्षेत्रातील हा प्रभाग मिश्र वस्तीचा आहे. येथे उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी आहे. भाजपने येथून पंकज यादव यांना उमेदवारी दिली आहे. पंकज यादव हा कुर्ल्यातील भाजपचा प्रमुख चेहरा. महापालिकेत यापूर्वीही त्यांनी उत्तर भारतीय प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आणि अनुभवी नेते रविराज तिवारी यांना रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसची पारंपरिक उत्तर भारतीय व्होट बँक आणि पक्षाची स्थानिक ताकद त्यांच्या पाठीशी आहे. येथे 'यादव विरुद्ध तिवारी' अशी लढत रंगणार असून मतदारांचे जातीनिहाय ध्रुवीकरण आणि काँग्रेसची ताकद यावर निकाल अवलंबून असेल.
३. प्रभाग क्र. १६७ : सायन (प्रतिक्षा नगर/कोळीवाडा)
राजेश सिंह (भाजप) विरुद्ध रामबाबू जैस्वाल (काँग्रेस)
हा प्रभाग सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात येतो. येथे उत्तर भारतीय कामगार आणि मध्यमवर्गीय मतदारांचा प्रभाव आहे. भाजपचे उमेदवार राजेश सिंह आर. तमिळ सेल्वन (स्थानिक आमदार) यांचे निकटवर्तीय मानले जातात. दक्षिण-मध्य मुंबईतील उत्तर भारतीय संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. जैस्वाल हे या भागातील जुने काँग्रेस कार्यकर्ते आहेत. समाजातील तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. भाजपच्या 'हिंदुत्व' कार्डला काँग्रेस 'लोकल संपर्क' आणि 'उत्तर भारतीय अस्मिता' याद्वारे उत्तर देत आहे.