Nagpur Municipal Election 2026: नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहराच्या राजकारणात हिंदू-मुस्लिम एकतेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते कामिल अन्सारी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. नागपूरमधील भाजपचे ते या निवडणुकीतील एकमेव मुस्लीम उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 8 मोमीनपुरा या मुस्लिमबहुल भागातून ते निवडणूक लढवत असून त्यांच्या या उमेदवारीमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहेत कामिल अन्सारी?
कामिल अन्सारी हे केवळ राजकारणी नसून त्यांची एक वेगळी सामाजिक ओळख आहे. विणकर ओबीसी समाजातून येणारे अन्सारी हे पसमांडा मुस्लीम आहेत. कुस्तीची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांना संपूर्ण नागपूर कामिल पहलवान या नावाने ओळखते.
ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दत्ता मेघे यांना ते गुरु मानतात आणि सध्या आमदार समीर मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरुपती अर्बन सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. याशिवाय यंग मुस्लिम फुटबॉल क्लबशी देखील त्यांचे जवळचे नाते आहे. खेळाडू वृत्ती आणि सामाजिक कार्याचा अनुभव ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे.
( नक्की वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटलेच नाहीत? विश्वास पाटील यांचा खळबळजनक दावा,सादर केले पुरावे )
'माझ्या वस्तीचा विकास हेच माझे स्वप्न'
नागपूर शहराचा गेल्या काही वर्षात चेहरामोहरा बदलला आहे, मात्र मोमीनपुरा सारख्या मुस्लीम वस्त्या विकासापासून मागे राहू नयेत, हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे कामिल अन्सारी सांगतात. 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये ते म्हमाले की, देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र केवळ घोषणा नसून ती कृती आहे, असे अन्सारी ठामपणे मांडतात. गेल्या काही वर्षांत पद नसतानाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांनी मोमीनपुरा भागात सुमारे 5 ते 6 कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत.
( नक्की वाचा : Thane News शिंदेंच्या ठाण्यात भाजपाचा 'मास्टरस्ट्रोक'; 40 उमेदवारांच्या यादीत 5 मुस्लीम चेहरे, वाचा सर्व नावं )
मुस्लीम मतदारांचा कल आणि भाजपची भूमिका
भाजपला मुस्लीम मतदार स्वीकारत नाहीत, हा समज आता जुना झाला असल्याचे अन्सारी यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, आता वस्तीत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मी जातीवादी नसून केवळ भारतवासी आहे, असे सांगताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
गेल्या 60 वर्षात ज्यांची सत्ता होती, त्यांनी केवळ आश्वासने दिली, पण भाजपने रस्ते, फुटबॉल मैदान आणि मुस्लिम स्मशानभूमी यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला. काँग्रेसची विश्वासार्हता संपल्यामुळे आता लोक भाजपच्या विकासकामांना प्राधान्य देत असल्याचे चित्र त्यांना दिसत आहे.
नवा इतिहास घडवण्याचा आत्मविश्वास
येत्या निवडणुकीत मोमीनपुरा भागात नवा इतिहास घडेल, असा विश्वास कामिल पहलवान यांनी व्यक्त केला आहे. तालीम म्हणजेच शिक्षण आणि बेरोजगारी या दोन बुनियादी म्हणजेच मूलभूत विषयांवर त्यांना प्रामुख्याने काम करायचे आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या सरकारी योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आधीच सक्रिय आहेत.
आता अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे या कामाला अधिक गती देण्याचा त्यांचा मानस आहे. नागपूरच्या या हायप्रोफाईल निवडणुकीत भाजपचा हा एकमेव मुस्लीम चेहरा किती प्रभावी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world