जाहिरात

Nagpur News : नागपुरातही भाजप-सेनेच्या नोंदणीला मुहूर्त सापडेना; काँग्रेसची नोंदणी कधी?

भारतीय जनता पक्षाच्या नव निर्वाचित 102 सदस्यांची गट नोंदणी मंगळवारी होणार नाही हे देखील आता स्पष्ट झाले आहे.

Nagpur News : नागपुरातही भाजप-सेनेच्या नोंदणीला मुहूर्त सापडेना; काँग्रेसची नोंदणी कधी?

Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगर पालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र महायुतीत लढवली असली तरी मुंबईच्या धर्तीवर नागपुरात देखील दोन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र नोंदणी करणार नसून दोन्ही पक्षांचे महानगर पालिकेत स्वतंत्र गट असतील. सत्तेत मात्र महायुती एकत्रित असेल, असे शिवसेनेच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नागपुरात महायुतीत दोन नगरसेवक निवडून आले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या नव निर्वाचित 102 सदस्यांची गट नोंदणी मंगळवारी होणार नाही हे देखील आता स्पष्ट झाले आहे. गट नेता ठरविण्यासाठी अद्याप मोठ्या नेत्यांची चर्चा झालेली नसल्याचे अंतर्गत सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. नागपुरात भाजपचा गटनेता, भाजपचे मोठे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत चर्चा करून ठरवला जाईल आणि त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्वाची भूमिका असेल, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे. 

28 जानेवारीपासून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी अवकाश घेत असल्याने आता ही नोंदणी फेब्रुवारी महिन्यात होईल, अशी दाट शक्यता आहे. येत्या 4 फेब्रुवारी रोजी भाजपचा गटनेता आणि महापौरांची नावे जाहीर करण्यात येऊ शकतात अशी भाजपच्या उच्च पदस्थ सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

नक्की वाचा - Chandrapur Mayor : चंद्रपुरात महापौरपदावर भाजपसह काँग्रेसचाही दावा; ठाकरे गट ठरणार किंगमेकर?

अजित पवारांची गट महायुतीसोबत...

अजितदादांच्या राष्ट्रवादीने नागपूर महानगर पालिकेची निवडणूक महायुतीत लढवली नाही. त्यांचा एकच उमेदवार आभा पांडे विजयी झाला आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या पक्षाची गट नोंदणी होईल. महायुतीत आम्ही लढलो नसलो तरी राज्यात आम्ही महायुतीचा घटक असल्याने नागपूर महानगर पालिकेत आम्ही भाजप आणि सेना या आमच्या सहयोगी पक्षांसोबत असू, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सांगत आहेत.


काँग्रेसची नोंदणी मंगळवारी

गटनेतापदी ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांचे नाव निश्चित झाल्यानंतर गटनेता नोंदणी देखील निश्चित करण्यात आली आहे. नागपूर महानगर पालिकेतील काँग्रेसचे नव निर्वाचित सदस्य मंगळवारी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी पोहोचतील. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com