लोकसभा निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी सर्वच पक्ष जोर लावत आहेत. शिवाय जिल्ह्यातील बड्या नेत्यांनाही गळाला लावलं जात आहे. त्यात नंदूरबारचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांनी गावित यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रावल आणि पाटील यांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. मागिल लोकसभा निवडणुकीत या दोघांच्या मेहनतीमुळे हिना गावित यांचा विजय सुकर झाला होता. मात्र आता त्यांच्या या निर्णयामुळे गावितांचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे.
रावल - पाटलांनी सोडली गाविताची साथ
जयपाल सिंह रावल हे नंदूरबार जिल्ह्या परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. तर अभिजीत पाटील हे शहादा कृषी उत्पन्न बाजारी समितीचे सभापती आहे. तापी काठावरचे दादा अशी या दोघांचीही ओळख आहे. मागिल लोकसभा निवडणुकीत या दोघांनीही विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित यांच्यासाठी प्रचार केला होता. शिवाय नंदूरबार आणि शिरपूर या दोन्ही विधानसभा मतदार संघातून त्यांना मोठी आघाडीही दिली होती. मात्र आता त्यांनी गावित यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा गावित आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. विजयकुमार गावित आणि त्यांच्या परिवाराच्या एकाधिकारशाहीला कंटाळून हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन मतदार संघावर पकड असलेले नेते सोडून गेल्याने विजयकुमार गावित आणि भाजपचे टेन्शन वाढले आहे.
हेही वाचा - शरद पवारांनी विखे पाटलांची उडवली खिल्ली, एक प्रश्न अन् सर्वच हसले
काँग्रेसच्या ॲड. गोवाल पाडवींना पाठिंबा
जयपाल सिंह रावल आणि अभिजीत पाटील या दादा नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवींना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. काँग्रेससाठी ही बाब मोठी दिलासा देणारी आहे. या दोघांची ताकद मिळाली तर पाडवी यांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. शिवाय खासदार म्हणून हिना गावीत या दोन वेळा निवडून गेल्या आहेत. त्यांच्या विरोधात सध्या वातावरण असल्याचेही बोलले जाते. शिवाय स्थानिक पातळीवर त्यांना विरोधही होत आहे. त्यामुळेच रावल आणि पाटील यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - 'बारामतीत अजित पवारांना हरवणार, मग पक्ष सोडणार'
नंदूरबारमध्ये काँग्रेस विरूद्ध भाजप लढत
नंदूरबार लोकसभेत काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच थेट लढत होत आहे. काँग्रेसने माजी मंत्री के. सी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने हिना गावित यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. हिना गावित यांना हॅट्रीक करण्याची संधी आहे. तर काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे.
हेही वाचा - इंडिगो फ्लाइटच्या उपम्यामध्ये मॅगीपेक्षाही अधिक सोडिअम, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरच्या Vlogमुळे नवा वाद