किशोर बेलसरे, प्रतिनिधी
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांचं नाव आघाडीवर होतं. भुजबळांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. भुजबळांनी माघार घेताच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 'NDTV मराठी' ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये गोडसे यांनी या जागेवर दावेदारी सादर केलीय. नाशिकमधून शिवसेनेचाच उमेदवार असेल. त्याबाबत लवकरच घोषणा होईल, असं त्यांनी जाहीर केलं.
काय म्हणाले गोडसे?
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये काही जागांवर तिढा होता. त्यामध्ये नाशिकच्या जागेवर भुजबळांनी लढावं असा केंद्रातील नेत्यांचा आग्रह होता. महाविकास आघाडीचा प्रचार सुरु होऊन तीन आठवडे झाले, पण अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्याचा उद्या कदाचित महायुतीच्या उमेदवाराला फटका बसला असता. त्यामुळे भुजबळसाहेबांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला. ही जागा शिवसेनेची आहे. ती शिवसेनेला सुटेल आणि तिथं लवकरात लवकर उमेदवाराची घोषणा होईल असा विश्वास आहे, असं गोडसे यांनी सांगितलं.
नाशिकचा तिढा सुटला, महायुतीमधील 'हा' पक्ष लढवणार निवडणूक?
या जागेवर तुमच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळालाय का? असा प्रश्न गोडसे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितलं की, 'मी गेल्या 10 वर्षांपासून खासदार म्हणून काम करत आहे. आम्ही अनेक विकासकामं नाशिक शहर, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी केली. अनेक लोकांशी घट्ट नातं निर्माण झालं आहे. आमचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री यावर सकारात्मक विचार करतील.'
छत्रपती संभाजीनगरचा पेच सुटला?, शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याला उमेदवारी मिळणार?
छगन भुजबळांना वरुन (दिल्ली) सांगितल्यानं तिढा निर्माण झाला होता. त्यांनी माघार घेतल्यानं तो सुटला आहे. ही जागा शिवसेनेची असल्यानं शिवसेनेलाच मिळेल आणि इथं शिवसैनिकालाच उमेदवारी मिळेल. खासदार म्हणून केलेल्या कामांमुळे शिवसेनेला चांगली संधी आहे. भाजपा, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिक पार्टी या सर्वांच्या सहकाऱ्यानं मोठं मताधिक्य प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती असल्यानं काही निर्णय सर्व पक्षांकडून एकत्र घेतले जातात. त्यामुळे हा तिढा निर्माण झाला होता. आता हा तिढा सुटलाय. लवकरच उमेदवाराची घोषणा होईल, असं गोडसे यांनी सांगितलं.