उत्तर महाराष्ट्रातील नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा महायुतीचा पेच आता संपलाय. नाशिकसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर, हा पेच सुटला राअसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नाशिकची जागा शिवसेनेला सोडवून घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादीनं दावा केला होता. भारतीय जनता पक्षही नाशिक मिळवण्यासाठी आग्रही होता. महायुतीमधील दोन्ही मित्र पक्षांवर मात करत अखेर ही जागा आपल्याकडं खेचण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय.
तिरंगी लढतीमध्ये इतिहास बदलण्याचं आंबेडकरांसमोर आव्हान
नाशिक लोकसभा मतदारसंघातून 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ विजयी झाले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 साली शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी बाजी मारली. गोडसे यांनी 2014 मध्ये छगन भुजबळांचा तर मागील लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळांचा पराभव केला होता. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
शरद पवारांवर बोलणं अर्चना पाटील यांनी टाळलं, कारण...
रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये निराशा
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात मात्र मुख्यमंत्र्यांना निराशा सहन करावी लागलीय. या परंपरागत मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास शिवसेना आग्रही होती. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. त्यांनी उमेदवारीचा अर्जही घेतला होता. पण, भारतीय जनता पक्षानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला गमवावा लागला. कोकणातील निराशेनंतर नाशिकमध्ये शिवसेनाला दिलासा मिळालाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world