विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप शेवटच्या टप्प्यात आहे. त्यात भाजपने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर अजित पवार गटाने काही जणांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे उमेदवारी न मिळालेले इच्छुक हे नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांचे मेळावे आयोजित केले आहेत. तर काहींनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या बंडखोरांनी उचल खाल्ली आहे. याचा फटका सध्याच्या स्थिती महायुतीला बसतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिक जिल्ह्यातील धनराज महाले,दिनकर पाटील आणि केदा आहेर हे इच्छुक नेते पक्षाचे अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने बंडाच्या तयारीत आहेत. दिंडोरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे धनराज महाले हे इच्छुक आहेत. त्यांनी मतदार संघात तयारीही सुरू केली होती. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटल्याने धनराज महाले हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांना या मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. शिवाय पक्षाचा एबी फॉर्म ही दिला आहे. त्यामुळे धनराज महाले यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेंडिंग बातमी - उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?
महाले यांच्या प्रमाणे दिनकर पाटील नाशिक पश्चिम मतदार संघातून भाजपाडकून इच्छुक होते. मात्र या मतदार संघात विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाच पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत सीमा हिरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर दिनकर पाटील हे नाराज झाले आहे. त्यामुळे त्यांना आता आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. या वेळाव्यात समर्थकांचे मते घेवून ते आपली पुढील भूमीका जाहीर करणार आहेत. मात्र ते सीमा हिरे यांच्या विरोधात बंडखोरी करणार हे जवळपास निश्चित आहे. या मतदार संघात अनेक वर्षापासून आपण काम करत आहे. त्यामुळे यावेळी संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आपल्याला डावलण्यात आल्याची भावना दिनकर पाटील यांची आहे.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले
चांदवड विधानसभा मतदार संघातही बंडखोरीची लागण होऊ शकते. चांदवड देवळा मतदार संघातून डॉक्टर राहुल आहेर यांनाच भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे राहुल आहेर यांनी आपण निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले होते. आपल्या ऐवजी आपले बंधू केदा आहेर यांना भाजपने उमेदवारी द्यावी असे त्यांनी सांगितले होते. असे असतानाही राहुल आहेर यांनाच उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे केदा आहेर हे नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यात ते निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या तीन मतदारसंघात सध्या माहायुतीची डोकेदुखी वाढल्याची शक्यता आहे.