Navi Mumbai : नवी मुंबईतील नाईकांचा जय रोखण्यासाठी 2 'विजय' मैदानात, कोण गुलाल उधळणार?

Navi Mumbai : नवी मुंबईत गेल्या काही दशकांपासून गणेश नाईक यांचं राजकीय वर्चस्व आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

मुंबई शहरावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती झाली. नियोजनपद्ध पद्धतीनं वसलेलं शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. सिडकोचे प्रकल्प, मेट्रो रेल्वेचा विस्तार तसंच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे नवी मुंबईचा वेगानं विस्तार झाला आहे. त्याचबरोबर आगामी काळात देखील हा भाग महत्त्वाचं आर्थिक आणि दळणवळणाचं केंद्र असणार आहे. मुंबई जवळच्या या शहराची ओळख झपाट्यानं बदलत चाललीय. त्याचबरोबर नवी मुंबईचं राजकारण बदलणार का? हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नाईकांची नवी मुंबई

नवी मुंबईत गेल्या काही दशकांपासून गणेश नाईक यांचं राजकीय वर्चस्व आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपा असा त्यांचा प्रवास झालाय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक बेलापूरमधून पराभूत झाले. पण, पाच वर्षांनी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत ऐरोलीमधून विधानसभा गाठली.

राज्यातील अन्य राजकारण्यांप्रमाणेच गणेश नाईक यांनी स्वत:च्या प्रभावाचा वापर घराणेशाही रुचवण्यासाठी केला. त्यांचे चिरंजीव संजीव नाईक 1995 साली वयाच्या 23 व्या वर्षीच नवी मुंबईचा महापौर बनले. नवी मुंबई शहराचं तीन वेळा महापौरपद भुषवल्यानंतर 2009 ते 2014 या काळात ते ठाण्याचे खासदार होते.

गणेश नाईक यांचे दुसरे चिरंजीवर संदीप नाईक यांनी देखील महापालिकेतूनच राजकीय कारकीर्द सुरु केली. 2009 आणि 2014 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर ऐरोली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. 2019 साली वडिलांबरोबर भाजपामध्ये प्रवेश केला. यंदा त्यांना बेलापूर मतदारसंघातून भाजपाचं तिकीट हवं होतं. पण, ती मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी जुन्या साहेबांच्या (शरद पवार) पक्षात जात तुतारी फुंकली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Navi Mumbai : नवी मुंबई कुणाची? दिग्गजांच्या भवितव्याची भुमीपूत्राच्या हाती किल्ली )

दोन विजयचं आव्हान

नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघात गणेश नाईक भाजपाकडून तर बेलापूरमध्ये संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. नाईक घराण्याच्या राजकीय वर्चस्वाला दोन 'विजय' (विजय चौगुले, विजय नहाटा) यांनी आव्हान दिलं आहे.

 विजय चौगुले हे एकेकाळी गणेश नाईक यांचे खास विश्वासू मानले जायचे, परंतु त्यांनी स्वतंत्र राजकीय मार्ग निवडला आणि आता त्याच गणेश नाईक यांच्या विरोधात जोरदार प्रचार करत आहेत. ऐरोलीत नाईकांच्या विरुद्ध त्यांचा हा सामना अतिशय चुरशीचा ठरत आहे.

दुसरे विजय म्हणजे विजय नहाटा, हे माजी प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी नवी मुंबईचे महानगरपालिका आयुक्त म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. यंदा त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून बेलापूरमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 च्या निवडणुकीतही नहाटांनी गणेश नाईक यांच्या मतदारसंघात हजारो मते आपल्याकडे वळवली होती, आणि त्यावेळी नाईकांच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते. म्हणूनच,  यंदाच्या निवडणुकीत देखील नाहटा गणेश नाईक यांच्यासमोर आव्हान ठरणार आहेत.

Advertisement

या दोन 'विजयां' मुळे नवी मुंबईतील राजकीय वादळ आणखी तीव्र झाले असून 23 तारखेला निवडणुकीचा निकाल नाईक घराण्याला किती मोठा धक्का देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. एकाच घराण्याच्या साम्राज्यावर दोन 'विजयां' नी केलेला हा ऐतिहासिक हल्ला चमत्कार घडवणार की नाईक घराण्याचा अजिंक्य बालेकिल्ला तसाच राहणार?  याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 

Topics mentioned in this article