जाहिरात

Navi Mumbai : नवी मुंबई कुणाची? दिग्गजांच्या भवितव्याची भुमीपूत्राच्या हाती किल्ली

नवी मुंबईत विधानसभेचे चार महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात आगरी कोळी समाजाचे मतदान निर्णायक ठरते.

Navi Mumbai : नवी मुंबई कुणाची? दिग्गजांच्या भवितव्याची भुमीपूत्राच्या हाती किल्ली
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

नवी मुंबई या शहराची निर्मिती  1970  च्या दशकात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी करण्यात आली. मुंबईचे पर्यायी उपनगर म्हणून सुरुवात झालेली नवी मुंबई आता वेगाने वाढणारे एक स्वायत्त आणि आधुनिक शहर बनले आहे. महाराष्ट्र सरकारने सिडकोच्या माध्यमातून हे शहर विकसित करण्यासाठी विशेष योजना आखल्या. ठाणे जिल्ह्यातील काही भाग आणि रायगडच्या पनवेल आणि उरण तालुक्यातील मोठ्या भागांचा समावेश नवी मुंबई प्रकल्पात झाला. शहरातील विविध विकास प्रकल्पांमुळे स्थानिक जमिनी घेतल्या गेल्या, ज्यामुळे पारंपरिक शेती, मत्स्य व्यवसाय आणि वसाहतींवर परिणाम झाला, विशेषतः आगरी-कोळी समाजाला मोठा फटका बसला. 

कोण आहेत आगरी-कोळी?

आगरी-कोळी समाज हा नवी मुंबईतील मुख्य स्थानिक रहिवासी असून त्यांचे पारंपरिक व्यवसाय मच्छीमारी आणि शेती असा होता. नवी मुंबईच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहित करण्यात आली, ज्यामुळे या समाजातील अनेक कुटुंबे विस्थापित झाली. या विस्थापनामुळे प्रकल्पग्रस्तांचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन प्रभावित झाले आहे. विस्थापितांना रोजगार, घर, तसेच आर्थिक सवलती मिळाव्यात अशी मागणी आजही प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे.

रोहिंगे, बांगलादेशी घुसखोरांना सुविधा देण्याचा काँग्रेसचा डाव, PM मोदींचा आरोप

( नक्की वाचा :  रोहिंगे, बांगलादेशी घुसखोरांना सुविधा देण्याचा काँग्रेसचा डाव, PM मोदींचा आरोप )

नवी मुंबईत कोणते मतदारसंघ?

नवी मुंबईत विधानसभेचे चार महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात आगरी कोळी समाजाचे मतदान निर्णायक ठरते. उरण, पनवेल, बेलापूर आणि ऐरोली हे ते चार मतदार संघ. या मतदारसंघात आगरी कोळी समाजाचे जवळपास 20 ते 50 टक्के मतदान आहे. पनवेल आणि उरण या दोन मतदारसंघात समाजाचे मतदान अधिक आहे.

उरण हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असलेला परिसर, परंतु 2014 साली  शिवसेनेचे मनोहर भोईर आणि 2019 मध्ये भाजपचे महेश बालदी यांनी उरण जिंकले. यावेळी देखील इथे भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात मुख्य लढत आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे  प्रीतम म्हात्रे यांनीदेखील बंडखोरी केलीय. त्यांची उमेदवारी आगरी कोळी मतांमध्ये फूट पडू शकते.

पनवेलमध्ये गेल्या चार टर्म पासून रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र प्रशांत ठाकूर हे आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्यामागे भाजपचे चिन्ह आणि आगरी कोळी समाजाचे पाठबळ आहे. बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघात गेली तीन दशके गणेश नाईक यांनी एकहाती सत्ता राखली आहे. 2014 आणि 2019 मध्ये बेलापूर मधून भाजपच्या मंदा म्हात्रे जरी आमदार झाल्या असल्या तरी या दोन मतदारसंघात नाईक यांचेच राजकीय वर्चस्व राहिले आहे. 

ऐरोलीतील गणेश नाईक यांनी भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळवली आहे, परंतु संदीप नाईक यांना बेलापूरची तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या तिकिटावर निवडणुकीत उडी घेतली आहे. आता ऐरोलीतील गणेश नाईक यांचा सामना मविआ चे एम के मढवी आणि बंडखोर अपक्ष विजय चौगुले यांच्याशी आहे, तसेच बेलापूर मध्ये मुख्य लढत संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात दिसेल.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी सांगितली बाबांच्या नवसाची कहाणी, स्वत:ही केला भर सभेत नवस!

( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी सांगितली बाबांच्या नवसाची कहाणी, स्वत:ही केला भर सभेत नवस! )

काय आहेत प्रश्न?

प्रकल्पांसाठी घेतलेल्या जमिनींवरील विस्थापितांची स्थिती अजूनही अनिश्चित आहे. पुनर्वसनात लागणारा विलंब, घरांच्या जागेची अपुरी व्यवस्था आणि रोजगाराच्या कमी संधी यामुळे अनेक प्रकल्पग्रस्त नाराज आहेत.अनेक प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी वारंवार अधिक भरपाईची मागणी केली आहे. आजही सिडकोच्या 12.50% योजनेचा मोबदला पूर्णपणे मिळालेला नाही. सिडकोच्या गलथान, अन्यायकरी आणि भ्रष्टाचारी कारभाराला सर्वच स्थानिक प्रकल्पग्रस्त बळी पडले आहेत. 

स्थानिक आगरी-कोळी समाजाला शिक्षण आणि रोजगारामध्ये आरक्षणाची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. अनेक स्थानिक नेते आगरी-कोळी समाजाच्या मागण्यांना समर्थन देत असले तरी, आरक्षणावर निर्णय होण्यात शासनाची दिरंगाई होत राहिली आहे. निवडणुकांच्या तोंडावर विविध राजकीय पक्ष आणि नेते आगरी-कोळी समाजाच्या प्रश्नांवर भर देत असतात. मात्र, त्यातील अनेक आश्वासने कधीच पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे या समाजातील मतदारांमध्ये नाराजी दिसून येते.

भाजपाचे स्थानिक नेते हे नवी मुंबईतील विकास कामांवर भर देत असून, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची आश्वासने देत आहेत. महायुतीचा प्रचार मुख्यतः विकास, रोजगार निर्मिती आणि समाजिक स्थैर्यावर आधारित आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी एकत्र येऊन समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीने प्रकल्पग्रस्तांसाठी अधिक भरपाई आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यावर ठोस पावले उचलण्याची ग्वाही दिली आहे.

यंदाच्या निवडणुकीत नवी मुंबईत आगरी-कोळी समाजाचे मत कोणाला मिळेल, हे महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहे. एकीकडे महायुतीचे विकास आणि रोजगार निर्मितीचे आश्वासन आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे पारंपरिक गरजांवर आधारित आश्वासन, त्यामुळे प्रकल्पग्रस्त मतदारांचा कल कोणत्या बाजूला जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: