लोकसभा निवडणुकीत मुंबईत महायुतीला सहापैकी फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. मुंबईतील या पराभवामध्ये मुस्लीम मतदारांनी एकगठ्ठा विरोधात केलेलं मतदान हे एक कारण समजलं जातंय. विधानसभा निवडणुकीत हा फटका टाळण्यासाठी महायुतीनं हालचाल सुरु केली आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मुस्लीम समाजाला सर्वाधिक जागा देण्याच्या तयारीत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
 
'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या जागा वाटपात मिळणाऱ्या एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत राष्ट्रवादीला चार जागा सुटणार असं मानलं जात आहे. या चारही जागांवर मुस्लीम उमेदवार देण्याबाबत विचार सुरु आहे. त्याचबरोबर एमएमआर विभागातील एका जागेवरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार दिला जाऊ शकतो.
मुंबईतील वांद्रे पूर्व, अणुशक्ती नगर, शिवाजीनगर मानखुर्दसह ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हा मतदारसंघ मिळावा, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. त्याचबरोबर धुळे, पाथरी, मालेगाव या मुस्लीमबहुल मतदारसंघासाठी देखील राष्ट्रवादी आग्रही आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागात मुस्लीम मतदार जास्त आहेत त्या मतदारसंघात मुस्लीम उमेदवार देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.
( नक्की वाचा : अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? आव्हाडांचं मोठं वक्तव्य, म्हणाले... )
 
लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी पाठ फिरवल्याचा फटकाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसल्याचं मानलं जात आहे. विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राष्ट्रवादी मुस्लीम उमेदवार देईल त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा महायुतीच्या अन्य उमेदवारांनाही मिळेल, अशी ही योजना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढवणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार 2019 साली निवडून आले होते. या जागा त्यांना मिळणार हे जवळपास निश्चित आहे. त्यात आणखी 15 ते 16 जागा मिळाव्यात असा अजित पवारांचा प्रयत्न आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जागा लढण्यासाठी आग्रही होती. मात्र आता त्यांनी काही ठिकाणी तडजोड करण्याचे निश्चित केले आहे. नुकतीच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यात हा निर्णय झाला आहे.