- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा प्रचंड प्रभाव दिसला
- धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी विजय मिळवला आहे
- रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांच्या मुलगा विकास गोगावले यांनी विजयी मिळवला.
सागर जोशी
Zilla Parishad Election Result 2026: जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाहीचा बोलबाला असल्याचं दिसून आलं आहे. कुणचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाच्या सुनबाई तर कुणाचे भाऊ-बहिण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात कुणाचा विजय झालाय. तर कुणाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक पार पडली. त्याचा निकाल लागला. जसजसे निकाल समोर येत गेले तशी अनेक ठिकाणी घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळाला.
अनेक ठिकाणी नेत्यांचे नातेवाईक विजयी झाले आहेत. धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा तेर जिल्हा परिषद गटातून विजयी झाल्या आहेत. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवरुन भाजपवर जोरदार टीका झाली होती. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांचा पराभव करत अर्चना पाटलांनी विजय मिळवला आहे. तर माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटातून माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्या आहेत. सातपुते यांच्यासमोर विद्यमान आमदार उत्तम जानकर यांचं मोठं आव्हान होतं. उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत राम सातपुतेंनी आपल्या पत्नीला निवडून आणलं आहे.
राम सातपुतेंची पत्नी विजयी झाली असली तरी मांडवे गटातून त्यांचा कार्यकर्ता धर्मा माने यांचा मात्र पराभव झाला आहे. रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांनी विजय मिळवला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांनीही विजय संपादन केला आहे. तर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भावजय रोहिणी अर्जुन आबिटकर यादेखील विजयी झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा झटका बसला आहे. गोरेंचे चुलत भाऊत अरुण गोरे आणि भावजय भारती अंकुश गोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा आमेर सत्तार यांचा विजय झाला आहे. तर धाराशिवच्या परंड्यात तानाजी सावंत यांना आव्हान देत अपक्ष लढलेले त्यांचे पुतणे धनंजय सांवत यांनीही मोठा विजय मिळवला आहे. माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांची सून मोहिनी खोत यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झाला आहे.
नक्की वाचा - शरद पवार ICU मध्ये? डॉक्टर काय म्हणाले; रोहित पवारांची कार्यकर्त्यांना नम्र विनंती
तर सांगलीच्या कुंडलमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनीही बाजी मारली आहे. पण परभणीत मात्र भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मतदारांनी मोठा दणका दिला आहे. वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच जणांना विविध पक्षातून तिकीट देण्यात आलं होतं. त्यातील चार जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. वरपुडकरांचा मुलगा, मुलगी आणि सुनेला पराभव पत्करावा लागलाय. तर त्यांचे पुतणे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. अजून अनेक छोट्या-बड्या नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकीत विजयी झाले आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घराणेशाहीचा विजय असो, असंच म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.