हिशोब चुकला? सुनेत्रा-सुप्रिया यांना नोटीस, निवडणूक आयोगाकडून 48 तासांचं अल्टिमेटम

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचं समोर आलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बारामती:

प्रतिनिधी,  जितेंद्र जाधव

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक प्रचार यंत्रणेच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याचं समोर आलं आहे. उमेदवारांनी दाखविलेल्या खर्चात आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील शॅडो रजिस्ट्रर खर्चात तफावत आढळली आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस जारी केली आहे. त्या संदर्भात 48 तासांत खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी झाली. त्यात सर्व 38 उमेदवारांनी खर्च सादर केला आहे. त्यात राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा 28 एप्रिलपर्यंतचा 37 लाख 23 हजार 610 रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र उमेदवारां खर्च प्रतिनिधीने दाखविलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केली. यावेळी एक लाख तीन हजार 449 रुपयांची तफावत आढळल्याचं निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवलं. उमेदवाराने दिलेला खर्च योग्य वाटत नसल्याचं नोटीसीत म्हटलं आहे. दरम्यान प्रतिनिधीने ही तफावत अमान्य केली आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी 28 एप्रिलपर्यंतचा खर्च 29 लाख 93 हजार 31 रुपये इतका झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र प्रतिनिधीने दाखविलेला खर्च आणि शॅडो रजिस्टरशी तुलना करता हा खर्च जुळत नाही. त्यात 9 लाख 10 हजार 901 रुपयांची तफावत आढळल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. उमेदवाराने दिलेला खर्च हा खरा आणि योग्य वाटत नसल्याने पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु ही तफावत उमेदवारांच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. त्यामुळे पवार यांना खुलासा करण्याची सूचना करण्यात आली. खुलासा न आल्यास ही तफावत मान्य असल्याचे समजून ती उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येईल असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

नक्की वाचा - पक्षविरोधी कारवायांमुळे शिवानी वडेट्टीवारांना नोटीस? अखेर पक्षाकडून स्पष्टीकरण

चार उमेदवारांना नोटीस... 
बारामती मतदारसंघातील उमेदवारांची खर्चाची पहिली तपासणी 25 एप्रिलला झाली होती. त्यात 38 पैकी 4 उमेदवारांनी खर्च सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांना नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या तपासणीपूर्वी खुलासा करण्याचं त्यात म्हटलं होतं. दुसऱ्या तपासणीवेळी सर्व उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.

Advertisement