विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, याशिवाय तीन दिवसात उत्तर पाठवण्यास सांगण्यात आलं होतं. पक्षविरोधी कारवायांमुळे ही नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा सुरू होती. अखेर या प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून स्पष्टीकरण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या 49 पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि तीन दिवसात उत्तर देण्याचं सांगण्यात आले होते. यात प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांचा ही समावेश होता. ही नोटीस निवडणुकीत पक्षाचे काम केले नाही किंवा पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मिळाल्या असाव्यात अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता प्रदेश युवक काँग्रेस तर्फे स्पष्टीकरण आले आहे. ही नोटीस पक्षातील कामाची मासिक समीक्षेची सामान्य प्रक्रिया असून यापैकी कुणीही पक्षविरोधी काम केले नसल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
नक्की वाचा - संभाजीराजे छत्रपतींचा अपमान कुणी केला? 2 Video दाखवत उदय सामंत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी शिवानी वडेट्टीवार आग्रही होत्या. त्याशिवाय विजय वडेट्टीवार यांच्याकडूनही शिवानी यांना तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र या जागेवरुन प्रतिभा धानोरकर यांनी दावा केला होता. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर ते या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मीडियासमोर जाहीरपणे त्यांनी ही जागा आपल्याच मिळणार असल्याचा दावाही केला होता. दुसरीकडे शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा जागेसाठी अनेकदा दिल्लीवारी केली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात पक्षाने प्रतिभा धानोरकर यांना तिकीट जाहीर केलं. या जागेवरुन भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवलं आहे. या जागेवरुन कोण बाजी मारणार हे आता 4 जूनला समोर येईल.