स्वानंद पाटील
बीड लोकसभा मतदार संघात यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने संधी दिली आहे. भाजपने प्रितम मुंडेंचे तिकीट कापून पंकजा यांना मैदानात उतरवले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने पुन्हा एकदा बजरंग सोनावणे यांच्यावर डाव खेळला आहे. बजरंग सोनावणे यांनी 2019 च्या निवडणुकीत प्रितम मुंडे यांना चांगलीच लढत दिली होती. जवळपास पाच लाखाच्या आसपास त्यांनी मतं घेतली होती. तर प्रितम मुंडे यांना साडे सहा लाख मतं मिळाली होती. विशेष म्हणेज वंचितच्या उमेदवारानेही या मतदार संघात लाखभर मतं मिळाली होती. मात्र यावेळीची निवडणूक थोडी वेगळी आहे. या मतदार संघात मराठा आरक्षणाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. त्यामुळे या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग चढला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीड मतदार संघाचा इतिहास
राज्याच्या राजकारणात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याला विशेष राजकीय ओळख मिळाली.अलीकडच्या काळात राज्यात सर्वाधिक चर्चेला राहिलेला मतदार संघ म्हणजे बीड लोकसभा मतदार संघ आहे. याआधी जिल्ह्याचे पाहिले खासदार हे रामचंद्र परांजपे हे होते. त्यानंतर 1967 साली पश्चिम महाराष्ट्रातील रहिवासी असलेले बीड जिल्ह्यातील नागरिकांनी क्रांतीसिह नाना पाटील यांनाही खासदार केले. त्यानंतर बीड मधून केशरकाकू क्षीरसागर या तीन वेळेला काँग्रेकडून खासदरकीला निवडून आल्या. जयसिंगराव गायकवाड हे भाजपा कडून दोन वेळेला तर राष्ट्रवादी कडून 1 वेळेला खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे हे खासदार झाले. त्याच्या अकाली निधनानंतर प्रीतम मुंडे या 2014 व 2019 ला खासदार झाल्या.
हेही वाचा - अधिकृत विरुद्ध बंडखोर! जळगावमध्ये भाजप समोर बंडखोर भाजप उमेदवाराचेच आव्हान
ऊसतोड कामगारांचा मतदार संघ
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून दुष्काळी जिल्हा आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात बहुतांश रोजगार हा साखर कारखानदारीवरच अवलंबून आहे. मात्र यातील काही कारखाने बंद झाल्याने ऊसाचा बेरोजगारीचा प्रश्न सतत जिल्ह्याला भेडसावत असतो. प्रत्येक पक्षाचे राजकारणी निवडणुकीच्या वेळेला विकासाच्या घोषणा आणि वल्गना करतात. पण त्या पुर्ण होत नाही अशी इथल्या नागरीकांची ओरड आहे. यामुळे बीड जिल्ह्यात रोजगाराचा मोठा प्रश्न कायमस्वरूपी दिसून येतो. परळी येथे असलेल्या औष्णिक विद्युत केंद्र मार्फत काही प्रमाणात रोजगार जिल्ह्यात उपलब्ध झाला. मात्र जुने संच मोडीत काढल्याने तीन संचावरच जिल्ह्यातल्या रोजगाराची भिस्त आहे. देशातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथचे कॉरीडॉर झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे कॉरिडॉरची मागणी गेल्या काही दिवसात जोर पकडत आहे.
ओबीसी विरूद्ध मराठा लढत
यंदाच्या लोकसभा निवडणुकीला ओबीसी विरुद्ध मराठा असे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे निवडणुकीला विकासाचे मुद्दे पाहिजे तितक्या प्रमाणात मांडले गेले नाहीत. राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत पाहायला जरी मिळत असली तरी बीड जिल्ह्यात मात्र नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार अशी थेट लढत असल्याचे दिसून येत आहे. खुद्द नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडेंसाठी अंबाजोगाई येथे सभा घेतली. तर शरद पवार यांनी बजरंग सोनवणे यांच्यासाठी बीड जिल्ह्यात मुक्काम करून अंबाजोगाई आणि बीड येथे दोन सभा घेतल्या. एकंदरीत या लढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
धनंजय मुंडे- पंकजा मुंडे एकत्र असल्याचा फायदा
गेल्या दहा वर्षापासून एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जरी असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीने ते काम करतात. याचा फायदा उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना नक्की होईल असे बोलले जात आहे. तसेच माजलगाव येथील सभेत गडकरींनीही पंकजा मुंडेंची गॅरंटी घेतल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले आहे. तर बजरंग सोनावणे यांनीही दिल्ली गाठण्यासाठी जोर लावला आहे. या लढतीला मराठा विरुद्ध ओबीसी रंग दिला गेला आहे. तसे झाल्यास बजरंग सोनावणेंनाही दिल्ली गाठण्याची संधी आहे असे बोलले जात आहे.
मतदार संघात कोणाची किती ताकद?
बीड लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्या पैकी गेवराई आणि केज मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. चार मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्या पैकी संदीप क्षिरसागर हे शरद पवार गटात आहेत. तर अजित पवारांबरोबर तीन आमदार आहेत. गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज, आणि परळी विधानसभा मतदारसंघांचा बीड लोकसभेत समावेश होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world