मंगेश जोशी
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अनेक वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यावर्षी भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून करण पवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्मिता वाघ यांना भाजपकडून संधी
भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या गेल्या अनेक वर्षांपासून भाजप सोबत काम करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या कार्यकर्त्या देखील आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार आहेत. त्यांनी भाजपला सोडचिट्टी देत ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंच्या सेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीकडून स्मिता वाघ आणि महाविकास आघाडी कडून करण पवार यांच्यात सरळ लढत आपल्याला पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - हिना गावित विजयाची हॅटट्रिक मारणार? की काँग्रेस पुन्हा गड काबीज करणार?
जळगावात भाजप सेनेचे वर्चस्व
जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. कारण सर्वाधिक आमदार महायुतीचे जळगाव लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी भाजपची ताकद जरी जास्त दिसत असली तरी जनतेत केंद्र सरकार आणि महागाईच्या विरोधात काही प्रमाणात असंतोष असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फायदा हा महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना होऊ शकतो अशीही चर्चा आहे. मात्र जळगाव लोकसभा हा नेहमीच भाजपचा गड राहीला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या 35 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. मधला एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचेच खासदार निवडून आलेलं पाहायला मिळाले आहे.
हेही वाचा - रावेर लोकसभा : एकनाथ खडसेंच्या घरवापसीचा सुनेला फायदा?
मतदार संघाचे प्रश्न काय?
जळगाव जिल्ह्यात एमआयडीसी, पाण्याचे प्रश्न तसेच सिंचन संदर्भात कुठे ठोस काम झालेलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्नही आहेतच. मतदारसंघातील तरुणांचा महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे. एमआयडीसी मधील अनेक प्रकल्प हे 30 ते 40 वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडून सुरू झालेले आहेत. परंतु सद्यस्थितीत ते बंद आहेत. हे पुन्हा सुरू करण्याचे आवाहन आहे. - गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले अमळनेर तालुक्यातील तापी निम्न प्रकल्प पाडळसर धरण, सिंचनाचे प्रकल्प व पाणी टंचाईची समस्या, जळगाव एमआयडीसीत एकही मोठे उद्योग नाही त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. जळगावची ओळख सुवर्णनगरी असूनही त्या संदर्भात कुठलीही रोजगार स्थानिकांना उपलब्ध नाही. जिल्ह्यातील रस्त्यांसह अनेक विकास कामे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत.
जळगाव लोकसभेचा इतिहास काय?
देशभरातील इतर सगळ्याच मतदारसंघां प्रमाणं इथंही काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. काँग्रेसचे हरि विनायक पाटसकर हे या मतदारसंघाचे पहिले खासदार होते. गुणवंतराव सरोदे यांच्याकडून काँग्रेसच्या वर्चस्वला धक्का देत हा मतदारसंघ भाजपला मिळवून दिला. त्यानंतर यशवंत महाजन, हरिभाऊ जावळे आणि ए. टी. पाटील यांनी भक्कमपणे धुरा सांभाळली. याठिकाणचा भाजपचा बोलबाला कायम ठेवला. गेल्यावेळी उन्मेष पाटील याठिकाणी भाजपकडून निवडून आले होते. बदलत्या राजकीय घडामोडींमुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना आताचा उद्धव ठाकरे गट यांना प्रथमच आपला उमेदवार देण्याची संधी मिळाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world