महायुती ठाकरे गटाचा गड भेदणार?; परभणीत संजय जाधव-महादेव जानकरांमध्ये लढत

परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
परभणी:

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि ज्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या मतदारसंघांमध्ये परभणीचा देखील समावेश होतो. परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. 

शिवसेनेत फूट पडली त्यावेळी उद्धव ठाकरेंसोबत जे मोजके सहकारी थांबले होते, त्यामध्ये परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाकडे सर्वजण जात असताना प्रवाहाविरुद्ध जात संजय जाधव यांनी शिंदे गटात राहून आपली निष्ठा दाखवली. त्यामुळे आता त्यांना निवडून आणणे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीसमोर मोठं चॅलेन्ज असेल. 

(नक्की वाचा-  अकोला मतदारसंघ : तिरंगी लढतीमध्ये इतिहास बदलण्याचं आंबेडकरांसमोर आव्हान)

तर दुसरीकडे महायुतीकडून परभणीतून कोण लढणार याची चर्चा खूप आधीपासूनच सुरु झाली होती. शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ जाईल अशी चर्चा होती. मात्र अचानक येथे रासपच्या महादेव जानकर यांची एन्ट्री झाली. मागील काही वर्षांपासून राजकारणात काहीसे दुर्लक्ष झालेले जानकर या उमेदवारीमुळे अचानक चर्चेत आहे. 

महादेव जानकर महायुतीत नाराज असल्याने महाविकास आघाडीकडून त्यांना आपल्यासोबत घेण्याचे प्रयत्न सुरु होते. माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात होता. मात्र शरद पवारांना चकवा देत जानकर महायुतीसोबत आले आणि परभणीतून उमेदवारी देखील मिळवली. 

Advertisement

शिवसेनेचा बालेकिल्ला

परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यामुळे खूप प्रयत्न करुनही एकनाथ शिंदे यांना येथील शिवसैनिकांना आपल्यासोबत घेण्यात यश आलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देखील येथील ठाकरे गटाचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. 

(नक्की वाचा - अमरावतीत विरोधकांची एकी, वाढवणार नवनीत राणांची डोकेदुखी?)

संजय जाधव यांना देखील यंदाची निवडणूक म्हणावी तितकी सोपी नसेल. कारण भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी संजय जाधवांविरुद्ध मोर्चेबांधणी सुरु केली आहे. परभणीतील विकासकामांच्या मुद्द्यांवरुन संजय जाधव यांना टार्गेट केलं जात आहेत. विकासकामांना निधी देखील पूर्णपणे वापरला जात नसल्याची टीका सातत्याने त्यांच्यावर केली जात आहे. त्यामुळे विकासकामांच्या मुद्द्यांवरुन सततच्या होणाऱ्या टीकेचा त्यांना फटका बसू शकतो. 

Advertisement

मतदारसंघातील जातीय समीकरण

विद्यमान खासदार संजय जाधव यांची येथे मराठा मतांवर भिस्त असेल. तर महादेव जानकर यांचा भाजपची पारंपरिक आणि ओबीसी मतांवर डोळा असेल. दोन्ही बाजूंनी मतांचं विभाजन होण्याची शक्यता मोठी आहे. कारण एकूण उमेदवार येथून रिंगणात आहे. त्यातल्या त्यात महायुतीने मराठा मतांमध्ये फूट पाडण्यासाठी काही मराठा नेत्यांनाही ताकद दिली आहे.  

वंचितचा उमेदवार

वंचित बहुजन आघाडीने पंजाबराव डक यांना परभणीतून उमेदवारी दिली आहे. पंजाबराव डक यांचं येथे मोठं नाव आहे. त्यामुळे वंचितकडून ते जास्तीत जास्त मतं घेऊ शकतात. या मतांचा फटका महाविकास आघाडीलाच बसण्याची जास्त शक्यता आहे. याशिवाय मराठा आंदोलनातील नेते सुभाष जावळे, स्वाभिमानीचे किशोर ढगे हे देखील येथून रिंगणात आहेत. यांचा फटका देखील कुठे ना कुठे संजय जाधव यांना बसण्याची शक्यता आहे.  या मताचं विभाजन टाळण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. 

Advertisement

परभणी लोकसभेची विधानसभानिहाय ताकद

परभणी लोकसभा मतदारसंघात परभणीतील चार आणि जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होते. यामध्ये जिंतूर मतदारसंघात भाजपच्या मेघना साकोरे-बोर्डीकर या विद्यमान आमदार आहेत. परभणी मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राहुल वेदप्रकाश पाटील हे विद्यमान आमदार आहेत.  

गंगाखेड या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत. पाथरी मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश अंबादासराव वरपुडकर आमदार आहेत. बबनराव लोणीकर हे परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तर घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे हे विद्यमान आमदार आहेत.

मतदान कधी?

परभणी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तर निकाल ४ जून रोजी लागणार आहे.