जाहिरात
Story ProgressBack

अमरावतीत विरोधकांची एकी, वाढवणार नवनीत राणांची डोकेदुखी?

महायुतीतील सहकारी आणि विरोधकांच्या एकीमुळे नवनीत राणा यांची कोंडी होण्याची शक्यता बोलली जात आहे. 

Read Time: 3 min
अमरावतीत विरोधकांची एकी, वाढवणार नवनीत राणांची डोकेदुखी?
अमरावती:

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लढतींमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लागलं आहे. अमरावतीची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा यांना महायुतीने भाजपच्या तिकीटावर उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे निडणुकीच्या रिंगणात आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने देखील नवनीत राणा यांच्या विरोधात आपला उमेदवार दिला आहे. प्रहारकडून दिनेश बूब हे निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 'काठावर पास' झालेल्या नवनीत राणा यांना यंदाची निवडणूक जड जाऊ शकते. 

महायुतीतील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांचा प्रखर विरोध, बच्चू कडू यांची नाराजी आणि महाविकास आघाडीची अमरातीतील ताकद यामुळे नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचणं अगदीच सोपं नसेल. भाजपच्या तिकिटावर नवनीत राणा लढत असल्याने महायुतीची ताकद त्यांच्या पाठिशी असेलच. मात्र विजय खेचून आणण्यासाठी महायुतीची ताकद तितकी पुरेशी असेल का? हे निकालातून स्पष्ट होईलच. 

काँग्रेसच्या ताब्यातील चंद्रपूर पुन्हा जिंकण्यासाठी भाजपासमोर 3 मोठी आव्हानं

नवनीत राणा यांच्यासमोरील आव्हान

नवनीत राणा 2019च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अमरावतीचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र यावेळी राजकीय परिस्थिती बदलली आहे. राज्याचं राजकारण 360 डिग्रीत फिरलं आहे. अमरावातीत देखील तीच स्थिती आहे. मागील निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर असलेले आनंदराव अडसूळ महायुतीचा भाग असले तरी त्यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला त्यांनी कडाडून विरोध केला होता. राणा दाम्पत्याने अभिजीत अडसूळ यांची भेट समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. मात्र तो यशस्वी ठरेल का हे अद्याप अस्पष्ट आहे. 

आनंदराव अडसूळ यांच्याशी अद्याप राणा दाम्पत्याची कोणतीही चर्चा झालेली नाही.  एकवेळ राजकारण सोडने पण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, असं आनंदराव अडसूळ यांनी आधीच जाहीर केलंय. त्यामुळे त्यांची भूमिका नवनीत राणांसाठी महत्त्वाची असणार आहे. कारण आनंदराव अडसूळ यांची अमरावतीतील ताकद सर्वश्रूत आहे. निवडणूक न लढता एखाद्या उमेदरावाराचा पराभव करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. 

विरोधकांची एकी, राणांची डोकेदुखी वाढवणार

दुसरीकडे बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. त्यांच्या पक्षाचे अमरावती लोकसभा मतदारसंघात दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यातही अमरावती लोकसभेचा निकाल फिरवण्याची क्षमता आहे. तर राणा दाम्पत्य आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यातही टोकाचा संघर्ष आहे. यशोमती ठाकूर या मोठ्या ताकदीने महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यासोबत उभ्या राहतील. त्यामुळे महायुतीतील सहकारी आणि विरोधकांच्या एकीमुळे नवनीत राणा यांची कोंडी होण्याची शक्यता बोलली जात आहे. 

'हनुमान चालिसा'चा मुद्दा उचलून धरत राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांना ओपन चॅलेन्ज दिलं. विविध मुद्द्यांवर राणा दाम्पत्याने महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला आणि भाजपची जवळीक साधली. मात्र हिंदुत्वाचा मुद्दा तसेत महाविकास आघाडीला विरोध याचा नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत कितपत फायदा होईल हे देखील पाहावं लागेल. 

 'मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका' राणांचा भाजपला घरचा आहेर

2019 लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

नवनीत राण यांना 2019 च्या निवडणुकीत 5,10,947 मतं मिळाली होती. एकूण मतांपैकी 27.87 टक्के मतं त्यांना मिळाली होती. तर आंनदराव अडसूळ यांना 4,73,996 मतं मिळाली होती. नवनीत राणा यांनी अवघ्या 36,951 मतांच्या फरकाने हा विजय मिळवला होता. त्याआधी आनंदराव अडसूळ दोन वेळा या मतदारसंघातून खासदार होते. मात्र 'वंचित'ने मिळवलेल्या मतांचा फटका अडसूळ यांना बसला होता. वंचितचा उमेदवाराने याठिकाणी 65 हजारांहून अधिकची मतं मिळवली होती.  

अमरावती मतदारसंघातील आमदारांची ताकद

अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी 3 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. तर दोन मतदारसंघात बच्चू कडू यांच्या प्रहारचे आमदार आहेत. तर रवी राणा हे बडनेरा येथून आमदार आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे एकत्रित मतांचा फायदा नवनीत राणा यांना झाला होता. मात्र आता परिस्थिती उलटी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), ठाकरे गट अशी मतं एकवटली आहेत. त्यात बच्चू कडू यांच्या पक्षाच्या उमेदवारांमुळे देखील मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.  याचा फटका नवनीत राणा यांना बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे अमरावतीचा निकाल नेमका काय असेल, हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination