Parbhani Lok Sabha 2024 : ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला जानकरांचं तगडं आव्हान, कोण होणार खासदार?

Parbhani Lok Sabha 2024 : महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळे परभणीची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली.

Advertisement
Read Time: 3 mins
Mahadev Jankar vs Sanjay Jadhav कोण होणार परभणीचा खासदार?
परभणी:

परभणी म्हंटलं की  'जगात जर्मनी आणि भारतात परभणी' 'बनी तो बनी नही तो परभणी' या दोन म्हणींचा नेमका अर्थ काय? त्यांचा उगम कसा झाला? हे कोणताही परभणीकरही सांगू शकणार नाही. परभणी जिल्ह्याच्या जडणघडणीशीही याचा काही संबंध नाही. राज्यात परभणी लोकसभा मतदारसंघ काहीसा असाच आहे. लातूर, नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांना मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद मिळालं. संभाजीनगरचा मराठवाड्यात नेहमी दबदबा राहिला. बीड, धाराशिव जिल्ह्यानंही दिग्गज नेते दिले. परभणीला तो मान आजवर मिळाला नाही. परभणीकरांनी सातत्यानं शिवसेनेचा खासदार करुनही पक्षानं त्यांना मंत्रीपद कधी दिलं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिवसेनेचा खासदार टिकत नाही

1989 पासून एक वर्षाचा अपवाद वगळता परभणीनं कायम शिवसेनेला साथ दिलीय. अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे-पाटील, संजय दुधगावकर या चार शिवसेनेच्या खासदारांनी काही वर्षांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विद्यमान खासदार संजय जाधव यांनीही खासदारकीचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेसशी मतभेद झाल्यानं जाधव यांनी राजीनामा दिला होता. महाविकास आघाडी फुटली. एकनाथ शिंदे बाजूला झाले. त्यानंतरही संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. यंदाची निवडणूक संजय जाधव यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर लढवली आहे. 

( नक्की वाचा : Beed Lok Sabha 2024 जरांगे की मुंडे फॅक्टर भारी? 'बीड' च्या गडावर कुणाचा झेंडा? )
 

जानकरांचं तगडं आव्हान

महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचा परभणीवर दावा होता. पण, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली. अजित पवारांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या बारामती मतदारसंघात जानकरांची ताकद आहे. त्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठीच राष्ट्रवादीनं जानकरांना परभणीचा उमेदवार होण्यास मान्यता दिली असं मानलं जातंय.

Advertisement

भाजपाचा परंपरागत मतदार आणि ओबीसी समाज यावर जानकरांची भिस्त आहे. शिवसेनेच्या खासदारांनी मतदारसंघाकडं दुर्लक्ष केलं. खासदारनिधी पूर्ण वापरला नाही. परभणीत उद्योगधंदे, रस्ते, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या समस्या कायम आहेत असा प्रचार जानकरांनी केला.

दुसरिकडं संजय जाधव यांनी भाजपानं भेदभावाचं राजकारण केल्याचा मुद्दा निवडणूक प्रचारात मांडला. ठाकरेसोबत राहिल्यानं शिवसेनेची पारंपारिक मतं आपल्यालाच मिळतील असा जाधव यांचा दावा आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर आणि परभणी मतदारसंघात शिवसेनेनं आजवर खान की बाण ? हा प्रचाराचा मुद्दा केला होता. यंदा ठाकरे गट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असल्यानं हा मुद्दा त्यांनी सोडून दिलाय.

Advertisement

( नक्की वाचा : Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला )
 

वंचित फॅक्टर किती चालणार?

2019 मधील लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांचा 42,199 मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या आलमगीर मोहम्मद खान यांना 1 लाख 49 हजार 946 मतं मिळाली होती. राष्ट्रवादीच्या पराभवात वंचितची मतं निर्णायक ठरली.

यंदा पंजाबराव डख हे वंचितचे उमेदवार होते. दलित आणि मुस्लीम मतं त्यांना किती मिळणार यावरही संजय जाधव यांच्या विजयाचं गणित अवलंबून असेल.

Advertisement

( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी? )
 

कुणाचे किती आमदार?

परभणी लोकसभा मतदारसंघात परभणीतील चार (जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी)  आणि जालना जिल्ह्यातील दोन (परतूर आणि घनसांगवी) अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये जिंतूर आणि परतूर या दोन मतदारसंघात भाजपाचा आमदार आहे. गंगागेखमध्ये महादेव जानकर यांच्या रासपचा आमदार आहे. घनसांगवीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर पाथरीमध्ये काँग्रेसचा आमदार आहे. सहा पैकी तीन जागा महायुती तर तीन महाविकास आघाडी असं समसमान बळ या मतदारसंघात आहे.

(नक्की वाचा : Dharashiv Lok Sabha 2024 : दीर - भावजयीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार? )
 

किती झालं मतदान?

परभणी लोकसभा मतदारसंघात 2019 साली 63.12 टक्के मतदान झालं होतं. यंदा 62.26 टक्के मतदान झालंय. दा गंगाखेड मतदारसंघात 63, घनसावंगी  60.93, जिंतूर 62.43, परभणी 62.62, परतूर 59.60 आणि पाथरीमध्ये 64.27 टक्के मतदान झालंय. महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद मतदारसंघात समसमान असल्यानं निकालाच्या मार्जिनवर त्याचा परिणाम होणार आहे.